समरजित घाटगे, राहुल देसाईंचा भाजपला सोडचिठ्ठी दिली.  
कोल्हापूर

Kolhapur politics : समरजित घाटगे, राहुल देसाईंचा भाजपला रामराम

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : भाजपबरोबर राहूनही बदललेल्या राजकीय परिस्थितीत विधानसभेसाठी पक्षाची उमेदवारी मिळणे कठीण असल्याने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व शाहू सहकार समूहाचे सर्वेसर्वा समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम करण्याचे ठरविले आहे. आपली राजकीय भूमिका जाहीर करण्यासाठी 23 ऑगस्ट रोजी त्यांनी आपल्या गटाचा मेळावा बोलावला आहे. त्यावेळी ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान, अशाच राजकीय कोंडीतून बाहेर पडण्यासाठी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनीही प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा पाठविला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीला जिल्ह्यात खिंडार पडले आहे.

समरजित घाटगे हे भाजपचे ग्र्रामीण जिल्हाध्यक्ष होते. 2019 मध्ये त्यांना भाजपची उमेदवारी दिली जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होेती. त्यामुळे भाजपकडून कागलमधून त्यांची उमेदवारी नक्की मानली जात होती; पण जागावाटपात शिवसेनेला ही जागा गेल्यामुळे समरजित घाटगे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. आता त्यांना संधी मिळेल, असे वाटत असतानाच राज्यातील राजकीय सत्तांतरात त्यांचे राजकीय विरोधक हसन मुश्रीफ हे अजित पवार राष्ट्रवादीच्या माध्यमातून महायुती सरकारचा घटक झाले व जिल्ह्याचे पालकमंत्रिपद त्यांच्याकडे आले. त्यामुळे विद्यमान आमदार व पालकमंत्री या नात्याने त्यांना उमेदवारी मिळणार, हे नक्की मानले जाते. त्यामुळे घाटगे राजकीय सत्तांतरानंतर अस्वस्थ होते. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

येत्या दि. 23 रोजी कागल येथे त्यांच्या गटाचा मेळावा घेण्यात येणार असून, त्यावेळी ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. येत्या दि. 3 सप्टेंबर रोजी शरद पवार कोल्हापूर दौर्‍यावर येत असून, त्यांची कागलच्या गैबी चौकात सभा घेण्याचे नियोेजन सुरू आहे. या सभेत त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येते. भाजपचा सहकारातील नेताच ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

या धक्क्यातून भाजप सावरण्यापूर्वीच पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तेथे शिंदे शिवसेनेचे प्रकाश आबिटकर विद्यमान आमदार असून, आपल्याला संधी मिळण्याची शक्यता नसल्याचे जाणून देसाई यांनी गेल्या काही दिवसांपासून आपली स्वत:ची संपर्क मोहीम राबविण्यास सुरुवात केली. ते बाहेर पडणार, याची गेली काही दिवस चर्चा होती. ती खरी ठरली आहे. देसाई हे काँग्रेस पक्षात जाण्याची शक्यता आहे. ए. वाय. पाटील यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तेही विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक आहेत. दरम्यान, महायुतीला ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे महत्त्वाचे नेते बाहेर पडल्याने खिंडार पडले आहे; तर महाविकास आघाडीला ताकद मिळणार आहे.

...म्हणून घाटगे यांनी निर्णय घेतला असावा : खा. महाडिक

विधानसभा निवडणूक लढवता येणार नाही, याची कल्पना आल्यामुळे समरजित घाटगे यांनी असा निर्णय घेतला असावा, त्यामुळे त्यांची भूमिका रास्त आहे. घाटगे हे गेली काही वर्षे विधानसभेसाठी तयारी करत आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आपण घाटगे यांच्याशी बोलणार असल्याचे व त्यांनी असा कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती करणार असल्याचे भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राजकीय भवितव्याच्या द़ृष्टीने निर्णय : देसाई

भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून आपण चांगल्याप्रकारे काम केले आहे. मात्र, आपण आपल्या राजकीय भवितव्याच्या द़ृष्टीने निर्णय घेतल्याचे राहुल देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

देसाई यांना भाजपमध्ये वरच्या पदावर संधी : महाडिक

राहुल देसाई यांनी नाराज होऊन राजीनामा दिला का, हे माहीत नाही. ते पक्षाचे नेते आहेत. आमचे नेते चंद्रकांत पाटील यांनी नाथाजी पाटील यांना जिल्हाध्यक्ष म्हणून संधी देण्याचे ठरविले. देसाई यांना वरच्या पदावर संधी देण्याचे नियोजन असावे, असे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT