Maharashtra Politics : अजित पवारांची सहानुभूतीसाठी वक्तव्ये?

बारामतीतून नाही, तर मग कोठून लढणार, हा मोठा प्रश्न
Ajit Pawar
अजित पवारांची सहानुभूतीसाठी वक्तव्ये?file photo
Published on
Updated on
सुहास जगताप, पुणे

‘बारामती विधानसभा मतदारसंघात मला आता रस राहिलेला नाही’, ‘सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आपल्या पत्नी सुनेत्रा यांना लोकसभेला उभे करणे ही चूक होती,’ अशी दोन अतिशय खळबळजनक विधाने करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्याच नव्हे, तर राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. शरद पवार यांना बारामतीत मिळालेली मतदारांची सहानुभूती आपल्याकडे वळविण्यासाठी अजित पवार यांनी ही विधाने ठरवून विचारपूर्वक केली असावीत, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. बारामतीतून जर अजित पवार लढणार नसतील तर मग ते कुठून लढणार, हा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झालेला आहे.

पुणे जिल्ह्यात तरी अजित पवारांना दुसरा सुरक्षित मतदारसंघ दिसत नसल्याने तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांतील मतदारसंघांत सध्याच्या अतिशय नाजूक राजकीय परिस्थितीत अजित पवार हे धोका पत्करू शकत नसल्याने कितीही चर्चा झाल्या, तरी अखेर अजित पवार हे बारामतीतूनच लढतील, अशी अटकळ बारामतीतील अजित पवारांच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांची आहे.

अजित पवारांच्या या भूमिकेची सुरुवात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झाली होती. प्रचार सभेतच अजित पवारांनी अगदी खणखणीतपणे सांगितले होते की, ‘लोकसभेच्या निवडणुकीला जर मला मिठाचा खडा लागला, तर मी पण मग विचार करेन पुढच्या वेळी काय करायचे ते’ बारामतीत काही वेगळे होईल याची चाहूल अजित पवार यांना त्याचवेळेस लागली असावी, आता त्याच्याच पुढचा भाग म्हणजे ‘बारामतीत मला रस राहिलेला नाही’ हे अजित पवारांचे विधान आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या वेळी अगदी अनपेक्षितपणे सुप्रिया सुळे यांना 48 हजारांचे मताधिक्य मिळाले आणि तिथेच अजित पवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. बारामतीतील राजकारणाचा फेरविचार करण्याची वेळ अजित पवारांवर आलेली आहे. बारामती शहर आणि ग्रामीण भागातील पक्षाचे अगदी गावपातळीपर्यंतचे पदाधिकारी बदलण्याचा निर्णय त्यामुळेच त्यांनी घेतलेला आहे. अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे बारामती विधानसभा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अशा वेळेला आपल्या तरुण पुतण्याविरुद्ध आपण निवडणूक लढविल्यास शरद पवारांच्या बाबतचे आपण जे बोललो होतो की ‘आता वय झाल्याने शरद पवारांनी निवृत्ती पत्करावी’ या आपल्या भूमिकेलाच धक्का बसू शकतो आणि आपली ती भूमिका आपल्यावरच उलटू शकते, अशी एक शंकाही अजित पवारांच्या मनात असावी, त्यामुळेच त्यांनी आपले पुत्र जय पवार यांना संधी देण्याचे ठरविले असावे, अशीही चर्चा आहे.

बारामतीतूनच का लढतील?

कारण 1

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना असलेल्या सहानुभूतीमुळे सुप्रिया सुळे यांना मतदान झाले आहे, ती सहानुभूती आता विधानसभेला राहणार नाही आणि लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार ही संकल्पनासुद्धा क्लिक होऊ शकते, त्यामुळे अजित पवार हे काहीही चर्चा झाल्या तरी अखेर बारामतीतूनच लढतील, असा विचारही त्यांच्या बाजूचे काही ज्येष्ठ कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.

कारण 2

अजित पवार यांनी जर बारामतीतून माघार घेतली, तर राज्यभर पक्षाच्या द़ृष्टीने एक चुकीचा संदेश जाईल आणि बारामतीतून अजित पवारांची माघार का, या प्रश्नाचे उत्तर पक्षाला राज्यभर प्रचारात द्यावे लागेल आणि विधानसभेच्या प्रचाराची दिशाच बदलून जाईल, त्यामुळे तो धोका अजित पवार हे पत्करणार नाहीत आणि ते बारामतीतूनच लढतील, असेही बोलले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news