सुनील कदम
Cheetah Reintroduction
कोल्हापूर : राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणामार्फत ‘कुनो’नंतर देशात आणखी दहा ठिकाणी चित्त्यांच्या पुनर्वसनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जवळपास 80 वर्षांपूर्वी राधानगरी आणि दाजीपूरच्या जंगलातून लुप्त झालेल्या चित्त्यांचे पुनर्वसन करण्याची संधी चालून आली आहे. शासकीय पातळीवरून प्रयत्न झाल्यास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चित्त्यांचा अधिवास निर्माण होऊ शकतो.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यापासून ते कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यापर्यंतच्या 740 चौरस किलोमीटर परिसरात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पसरलेला आहे. इथल्या जंगलांइतकी जैवविविधता देशातील अन्य कोणत्याही जंगलांमध्ये नाही. वाघ, बिबट्या, अस्वल, लांडगा, कोल्हा, तरस, हरीण, भेकर, गवा, ससा यांसह जवळपास 35 प्रकारचे वन्य प्राणी या ठिकाणी आढळून येतात. याशिवाय गरुडासह पक्ष्यांच्या 80 हून अधिक प्रजाती, सरपटणार्या प्राण्यांच्या 63 हून अधिक प्रजाती, फुलपाखरांच्या 265 प्रजातींसह 1800 प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी आढळून येतात.
सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाच ते सहा पट्टेरी वाघ असून आणखी काही वाघ बाहेरून आणून त्यांचे इथे पुनर्वसन करण्याच्या हालचाली वनखात्याने सुरू केल्या आहेत. त्याच्या जोडीनेच इथल्या समृद्ध जंगलांमध्ये चित्त्यांचे पुनर्वसन करणेही शक्य आहे.
पाच वर्षांपूर्वी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या वतीने राजस्थानच्या कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये चित्त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. हे पुनर्वसन काही प्रमाणात यशस्वी झाल्यानंतर आता व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने देशातील आणखी दहा ठिकाणी चित्त्यांचे पुनर्वसन करण्याची तयारी सुरू केली आहे. या दहा ठिकाणांमध्ये गुरू घासीदास राष्ट्रीय उद्यान (छत्तीसगड), बन्नी राष्ट्रीय उद्यान (गुजरात), दुबरी अभयारण्य (मध्य प्रदेश), संगारा उद्यान (मध्य प्रदेश), बगदरा अभयारण्य (मध्य प्रदेश), दुर्गावती व्याघ्र प्रकल्प (मध्य प्रदेश), कुनो राष्ट्रीय उद्यान (राजस्थान), शाहगड राष्ट्रीय उद्यान (राजस्थान) आणि कैसूर अभयारण्य (मध्य प्रदेश) या दहा ठिकाणांचा समावेश आहे. पण महाराष्ट्रातील एकाही अभयारण्याचा त्यात समावेश नाही. मात्र शासकीय पातळीवरून प्रयत्न केल्यास चित्त्यांच्या पुनर्वसनासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निवड होऊ शकते.
पूर्वी दाजीपूर आणि राधानगरीच्या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात चित्ते असल्याच्या नोंदी आढळून येतात. पण जंगलतोड आणि चोरट्या शिकारींमुळे स्वातंत्र्यपूर्व काळातच इथले चित्ते नामशेष झाले. त्यानंतर कधीही त्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न झाले नाहीत. आता राष्ट्रीय पातळीवर देशातील दहा ठिकाणी चित्त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशावेळी या यादीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे नाव येण्यासाठी राज्य शासनाने आग्रह धरल्यास तसे प्रयत्न सार्थकी लागू शकतात.
चित्त्यांच्या अधिवासासाठी अर्धशुष्क वातावरण पोषक ठरते. नेमके तसेच वातावरण इथे असल्यामुळे पूर्वी इथे मुबलक प्रमाणात चित्ते होते. चित्त्यांचे जीवशास्त्र, त्यांची जीवनशैली, त्यांचा अधिवास, त्यांना लागणारे छोट्या प्राण्याचे खाद्य, शिकारीसाठी लागणारे गवताळ मैदानी प्रदेश, वर्षभर असणारा मुबलक पाणी पुरवठा या सगळ्या बाबी अनुकूल आहेत. या सगळ्या बाबी विचारात घेता या ठिकाणी चित्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी नेटाने प्रयत्न करण्याची मात्र आवश्यक आहे. तसे ते झाल्यास या भागातून लुप्त झालेला चित्ता पुन्हा एकदा बघायला मिळू शकतो.