Kolhapur Sahakar Darbar
कोल्हापूर : सावकारांच्या छळामुळे सामान्य माणसाला जिवंतपणी मरण सहन कराव्या लागत आहेत. सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले असल्याने यातून त्यांची सुटका करण्यासाठी सावकारीचा बंदोबस्त करा, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. ते सहकार दरबार कार्यक्रमात बोलत होते. जिल्ह्यातील सहकारी चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी सहकार दरबारमधून पाठबळ मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या कल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात सोमवारी सहकार दरबार भरविण्यात आला होता. याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
सहकारातील अडचणी वेळेत सुटल्यास सहकारी संस्था अधिक कार्यक्षम बनतील. सभासदांचा विश्वास निर्माण होईल. नवीन सहकारी संस्था स्थापन होण्यास चालना मिळेल. सहकार चळवळ ही सामूहिक नेतृत्व व समाजघटकांच्या एकात्मतेचे प्रतीक आहे, असेही आबिटकर म्हणाले. विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम यांनी स्वागत केले व प्रास्ताविकामध्ये सहकार दरबारचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रभारी जिल्हा पोलिस प्रमुख नितेश खाटमोड-पाटील, प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, जिल्हा लेखा विशेष कार्यालयातील किरण पाटील आदी उपस्थित होते. सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनीही याठिकाणी भेट दिली. विभागीय सह निबंधक कार्यालयातील अधीक्षक मिलिंद ओतारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्यातील पहिला सहकार दरबार कोल्हापुरात भरविण्यात आला होता. या उपक्रमाचे अनुकरण करत अन्य जिल्ह्यातीलही हा उपक्रम सुरू करावा, अशी अपेक्षाही आबिटकर यांनी व्यक्त केली.