कोल्हापूर

डॉ. आंबेडकर ग्रंथालय व डिजिटल लायब्ररीसाठी ५० लाखांचा निधी : राजेश क्षीरसागर

अमृता चौगुले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी 6 डिसेंबर 2021 ला ऐतिहासिक बिंदू चौकात अभिवादन करताना कोल्हापूरात डॉ. आंबेडकर यांच्या नावे भव्य ग्रंथालय आणि थीम पार्क उभारणार अशी ग्वाही दिली होती. त्यासाठी पर्यटन विभागाकडून निधी मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. अवघ्या दोन महिन्यात पाठपुराव्याला यश आले असून शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने पर्यटन विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय व डिजिटल लायब्ररीसाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी महापालिकेकडे वर्गही करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

कोल्हापूर शहरातील विचारे माळ येथे बुध्द विहार आहे. त्याठिकाणीच पंचशिल भवन हा सामाजिक हॉल बांधण्यात आला आहे. या हॉलच्यावर आणखी एक मजला वाढविण्यात येणार आहे. सुमारे एक हजार चौरस फूटात सुसज्ज ग्रंथालय तयार केले जाणार आहे. ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित सर्व पुस्तके, ग्रंथ असतील. यात सामाजिक, कायदेविषयक, राजकीय, कृषी विषयांसह इतर सर्व पुस्तकांचा समावेश असेल. सदर बाजार, विचारे माळसह शहरातील अभ्यासूंना या ग्रंथालयाचा चांगला फायदा होईल. याठिकाणी डिजिटल लायब्ररी तयार केली जाणार आहे. स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. याठिकाणी सर्व अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अतूट मैत्री होती. कोल्हापूरकरांना डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम आहे. त्यामुळेच कोल्हापूरांनी डॉ. आंबेडकर यांचा जगातील पहिला पुतळा बिंदू चौकात बसविला. डॉ. आंबेडकर यांचा हा पुतळा आम्हाला प्रेरणादायी ठरतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट साकारण्यासाठी थीम पार्कची संकल्पना आखण्यात आली असून, डॉ. आंबेडकर यांचे संघर्षमय जीवन आणि त्यातूनही त्यांनी देशासाठी दिलेले अमूल्य योगदान आदीसह इतर घटनांचा समावेश असेल. भावी पिढीसाठी तो मार्गदर्शक ठरावा, अशी मांडणी केली जाणार आहे. जेणेकरून त्यांच्या विचारांनी प्रेरीत भावी पिढी घडेल, या थीम पार्क आणि स्मारकासाठी ३ कोटी निधीची मागणी येत्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात येणार आहे, असेही राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी प्रयत्न…

कोल्हापूर पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास येत आहे. रोज हजारो पर्यटक कोल्हापूरला भेट देत असतात. पर्यटकांना कोल्हापूरची ऐतिहासिक माहिती व्हावी यासाठी विविध कामासाठी निधी मिळावा म्हणून राज्याच्या पर्यटन विभागाकडे पाठपुरावा करत आहे. त्यातंर्गत यापूर्वी रंकाळा तलाव संवर्धन व सुशोभिकरणासाठी 15 कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी 10 कोटी महापालिकेकडे वर्गही झाले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठीही निधी मंजूर झाला आहे. कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी जे जे शक्य आहे ते करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असेही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी सांगितले.

ग्रंथालय व डिजिटल लायब्ररीचे स्वरूप…

  • इमारत सुशोभिकरण
  • सुसज्ज ग्रंथालय
  • डिजिटल लायब्ररी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT