आजरा : पुढारी वृत्तसेवा
मडिलगे ता. आजरा येथे अज्ञातांनी घरावर दरोडा टाकत पत्नीला ठार केले. तर मारहाणीत पती जबर जखमी झाला आहे. पुजा सुशांत गुरव (वय ३१) ही महिला ठार झाली आहे, तर सुशांत सुरेश गुरव (वय ३२) हे जबर जखमी झाले आहेत. रविवार दि १८ रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
यामध्ये अंगावरील दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेने मडिलगे पंचक्रोशी हादरून गेली आहे. सुशांत गुरव यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या विषयी अधिक माहिती अशी की, नेहमीप्रमाणे गुरव दांपत्य मुलांसोबत घरी झोपले होते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास गुरव यांना जाग आली. त्यानंतर ते प्रातः विधीसाठी गेले. दरम्यान त्यांच्या पत्नीचा जोराने ओरडताना आवाज आला म्हणून त्यांनी पाहिले असता घराचे दोन्ही दरवाजे उघडे होते. अज्ञात चौघेजण पुजा यांना मारहाण करताना दिसले.
पत्नीला मारणाऱ्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता गुरव यांनाही जबर मारहाण केली. पत्नीच्या अंगावरील दागिने व गुरव यांच्या गळ्यातील चेन व जवळच असणाऱ्या बॅगेतील रोख रक्कम व दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाले.
यावेळी पती सुशांत गुरव यांनी दोन मुलांना घराबाहेर घेऊन आरडाओरडा केल्यानंतर शेजा-यांना समजले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक यांनी भेट दिली. यावेळी श्वानपथकाच्या माध्यमातून शोध घेण्यात आला. पतीच्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.