Kolhapur rare wild cat sighting
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील हेर्ले गावांमधील निलेश कोळेकर या शेतकऱ्याच्या शेतामधील ऊस तोडणी चालू असताना दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या वाघाटी (Rusty Spotted Cat) या रान मांजराची दोन पिल्ले आढळून आली. त्यांनी तत्काळ वन विभागाला याबाबत कळवले.
त्यानुसार करवीर वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर वनविभागाचे वन्यजीव बचाव पथक तत्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. प्रथमदर्शनी ती पिल्ले खूपच लहान असल्याकारणाने त्यांचे व त्यांच्या आईचे पुनर्मिलन घडवून आणण्याचे वन्यजीव बचाव पथकाने ठरवले. त्यानुसार ती पिल्ले त्याच ठिकाणी ठेवून त्यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे नजर ठेवण्यात आली.
रविवारी (दि.21) संपूर्ण रात्र आईची वाट पाहण्यात आली. परंतु, त्यावेळी आई आली नाही. पण वनविभागाने हार न मानता दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. 22) सकाळी परत त्याच ठिकाणी दोन्ही पिल्ले ठेवली. त्याच्यावरही सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे नजर ठेवली. रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास त्या पिल्लांची आई आली व पहिल्या पिल्लाला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली. त्यानंतर रात्री 10.30 चा दरम्यान परत आई येऊन दुसऱ्या पिल्लालाही सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली. अशा तऱ्हेने आईपासून वेगळी झालेली ती वाघाटीची दोन्हीही पिल्ले सुखरूप पणे त्या आईपाशी पाठवण्यात वन विभागाला यश आले.
हे संपूर्ण बचाव कार्य कोल्हापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, वन्यजीव बचाव पथकचे प्रदीप सुतार, अमोल चव्हाण, अलमतीन बांगी, विनायक माळी, तसेच वनरक्षक प्रदीप जोशी यांनी पार पाडले.