

कोल्हापूर : हरिपूर (जि. सांगली) येथील दीपक आप्पासाहेब धर्माधिकारी (वय 69) यांच्या अवयवदानातून दोघांना जीवनदान मिळाले. याकरिता प्रशासनाच्या समन्वयातून शुक्रवारी सांगली ते कोल्हापूर आणि सांगली ते नाशिक असा ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. यामुळे ब्रेन डेड झालेल्या धर्माधिकारी यांचे यकृत अवघ्या 25 मिनिटांत सांगलीहून कोल्हापूर विमानतळावर आले, तेथून ते विशेष विमानाने दीड तासात नाशिकला पोहोचले तर किडनी सांगली-नाशिक असा ग्रीन कॉरिडॉरमधून रस्ते मार्गे नाशिकला नेण्यात आली.
मृत्यू हे अंतिम सत्य आहे असे मानले जाते. पण, वैज्ञानिक क्रांतीमुळे ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय आज सांगली आणि कोल्हापूरकरांना आला. धर्माधिकारी यांचे यकृत व मूत्रपिंड नाशिक येथील दोन रुग्णांसाठी जीवनरक्षक ठरले आहे. विमानतळावर अतिरिक्त सेवा अवयव घेऊन जाण्याकरिता बंगळूर येथून कोल्हापुरात आलेल्या विमानाला अतिरिक्त विमान वाहतूक नियंत्रण सेवा उपलब्ध करून दिली. ग्रीन कॉरिडॉरची अखेरची मोहीम विमानतळावरील कर्मचार्यांनी फत्ते केली. सुरक्षा परवाने तत्परतेने दिले. पडताळणी तत्काळ केली ग्राऊंड हँडलिंगसाठी दस्तावेज, सर्व यंत्रणांमध्ये समन्वय, अवयव घेऊन येणार्या अॅम्ब्युलन्स स्थितीसह वैमानिक दलाची तयारी आदींत संदीप सूर्यवंशी, प्रवीण आढाव व विकास पुजारी यांनी योगदान दिले.