विशाळगड, पुढारी वृत्तसेवा : ढोलताशांचा गजर….आकाशात फडकवणारे भगवी झेंडे, भक्तित भारावलेले भक्तगण, रंगीबेरंगी फुले, रोषणाईने सजविलेले मंदिर, दुपारी श्रीरामाचा जयघोष झाला अन् 'राम जन्मला गं सखी, राम जन्मला', 'सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय, प्रभू रामचंद्र भगवान की जय'. अशा भक्तिमय वातावरणात गुरुवारी (दि ३०) जयघोषाने विशाळगड येथील श्रीराम मंदिरात मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली. येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूवाडी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
येथे श्रीराम जन्म सोहळा दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी साजरा करण्यात आला. पुजारी सुभाष जंगम यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. जन्मोत्सवानिमित्त श्रीरामाची मूर्ती, गाभारा, फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आली होती. रामजन्म सोहळ्यानंतर श्रीरामाच्या वस्त्राचा म्हणजेच पागोट्याचा प्रसाददेखील भाविकांना देण्यात आला. दरम्यान गुरुवारी सकाळी ६ ते ८ वाजता अभिषेक व पूजन, सकाळी ९ ते ११ वाजता रामरक्षा स्रोत पठण व महादेव मंदिर ते श्रीराम मंदिर पालखी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली, दुपारी १२ वाजता जन्मोत्सव आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले.
यात मोठ्या प्रमाणात महिलावर्ग सहभागी झाल्या होत्या. यावेळी श्रीरामाची गाणी, पाळणा गायन झाले. पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रसाद, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ६ ते ८ पालखी सोहळा, रात्री ९.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. शिवाजी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बंडू भोसले, ग्रा.पं सदस्य मनोज भोसले, जगदिश अंगडी, नितेश जंगम, बापू भोसले, विजय जंगम, पोलीस पाटील उदय जंगम, उपसरपंच पूनम जंगम, अंकुश भोसले, आदींसह गडावरील नागरिक, भाविक तसेच महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
४३ वर्षांपासून गडवासीयांची परंपरा