कोल्हापूर

‘माझं काय चुकलं…?’ पराभवानंतर राजू शेट्टींची भावनिक पोस्ट

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : हातकणंगलेतून धैर्यशील माने यांनी ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना अस्मान दाखविले. महायुती व महाविकास आघाडीपासून समान अंतरावर राहत 'एकला चलो'ची भूमिका घेतलेल्या राजू शेट्टी यांना मात्र हा पराभव जिव्हारी लागला आहे.

'माझं काय चुकलं…'

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची लढत बहुरंगी झाली. अपक्षांसह २७ उमेदवार रिंगणात होते. मात्र खरी लढत धैर्यशील माने, सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी यांच्यातच झाली. धैर्यशील माने यांनी सलग दुसऱ्यांदा आपली जागा कायम राखताना सरूडकर यांचा १३ हजार ४२६ मतांनी पराभव केला. राजू शेट्टी यांना १,७९,८५० मते मिळाली. पराभवानंतर राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. "माझं काय चुकलं…! प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का? शेतकऱ्यांनो तुम्हीही…" अशी भावनिक पोस्ट त्यांनी फेसबूकवर केली आहे.

विरोधक फुटले, माने आले!

२०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद यांनी घेतलेल्या १ लाख २३ हजार मतांनी राजू शेट्टी यांना घरी बसविले. २०२४ च्या निवडणुकीत माने यांच्या विरोधकांत फूट पडली. राजू शेट्टी यांना पूर्वी साथ देणारे सत्यजित पाटील-सरूडकर ठाकरे शिवसेनेकडून मैदानात उतरले, तर बंचितने जि.प.चे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांना रिंगणात उत्तरवले होते. विरोधकांतील या फुटीमुळे माने यांना विजय मिळवून दिला.

आवाडेंच्या माघारीचा मानेंना फायदा

भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर आपण माघार घेत असल्याचे आवाडे यांनी जाहीर केली. त्यांच्या माघारीचा माने यांना फायदा झाला, आवाडे यांनी बंडाचे निशाण फडकविण्याची तयारी केली असली तरी नेत्यांच्या शब्दाला मान देतानाच त्यांनी आपलाही मतदारसंघ सेफ केला आहे.

विनय कोरे यांचा करिष्मा

कोणत्याही परिस्थितीत धैर्यशील माने यांना निवडून आणू, असा शब्द विनय कोरे यांनी दिला होता. त्यांनी तो खरा करून दाखविला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निकटचे संबंध असलेले विनय कोरे यांनी आपल्या आघाडीच्या यशासाठी जीवाचे रान केले. मतदारसंघात प्रमुख कार्यकर्त्यांकरवी संपूर्ण नियंत्रण ठेवत प्रचार मोहिमेवर आणि होणाऱ्या मतदानावर बारीक लक्ष ठेवले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT