Rajendra Patil Yedravkar  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur ZP Election | शिरोळ तालुक्यावर आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचे निर्विवाद वर्चस्व

Shirol Taluka Election Results | जिल्हा परिषदेचे ४ सदस्य तर पंचायत समितीचे १० सदस्य विजयी

पुढारी वृत्तसेवा

Shirol Dr Rajendra Patil Yedravkar

कुरुंदवाड, शिरोळ: शिरोळ तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत तालुक्यात आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्हा परिषदेत चार जागांवर विजय मिळवत, तर पंचायत समितीत तब्बल दहा सदस्य निवडून आणत यड्रावकर गटाने सत्तेवर आपले नाव कोरले आहे.

या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी निकाल दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात पाहायला मिळाला. येथे मयूरचे डॉक्टर संजय पाटील यांच्या स्नुषा तसेच नागपूरचे छत्रपती यांची कन्या सौ. मृणालीनिराजे जाधव-पाटील यांचा शिंदे शिवसेनेच्या श्रीमंत उत्तरादेवी शिंदे यांनी पराभव केला. या निकालामुळे संपूर्ण तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून यड्रावकर गटाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

खासदार धनंजय महाडिक यांच्या भगिनी खासदार दत्ताजीराव कदम यांच्या नात असून सौ.मनीषा रणजित कदम ह्या तर छत्रपती ग्रुप चे प्रमोद पाटील यांचे बंधू अविनाश पाटील हे शिरोळ तालुक्यातील पंचायत समितीमध्ये सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी झाले आहेत.

गत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाने तीन जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले होते. मात्र यावेळी भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. काँग्रेस आणि शेतकरी संघटनालाही प्रत्येकी एक जागा मिळाली. स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजपाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नंदिनी संदीप कांबळे यांनी ६१८ मतांनी विजय मिळवला. दानोळी पंचायत समितीत काँग्रेसच्या दिपाली होगले विजयी झाल्या. कोथळी पंचायत समितीत स्वाभिमानीच्या ज्योती शरद कांबळे यांनी १६८ मतांनी विजय संपादन केला.

दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे शिवसेनेच्या श्रीमंत उत्तरादेवी शिंदे विजयी झाल्या. दत्तवाड पंचायत समितीत बाबा वनकोरे, तर सैनिक टाकळी पंचायत समितीत अविनाश पाटील (दोघेही शिंदे शिवसेना) विजयी झाले.

अब्दुललाट जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे शिवसेनेच्या श्रद्धा गायकवाड विजयी झाल्या. अब्दुललाट पंचायत समितीत मिलिंद कुरणे, तर अकीवाट पंचायत समितीत नाना उपाध्ये (शिंदे शिवसेना) यांनी विजय मिळवला.

यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसच्या अर्चना चौगुले विजयी झाल्या. यड्राव पंचायत समितीत शिंदे शिवसेनेचे प्रतीक पाटील, तर शिरढोण पंचायत समितीत मनीषा कदम विजयी झाल्या.

उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे अमोल चव्हाण विजयी झाले. उदगाव पंचायत समितीत दिप्ती जाधव, तर अर्जुनवाड पंचायत समितीत सीमा म्हैशाळे (दोन्ही शिंदे शिवसेना) विजयी झाल्या.

आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपाचे प्रशांत शहापुरे विजयी झाले. आलास पंचायत समितीत शिंदे शिवसेनेचे फजलेअली पाटील, तर गणेशवाडी पंचायत समितीत स्वाभिमानीच्या राजश्री मानकापुरे विजयी झाल्या.

नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे शिवसेनेच्या प्रचिती कोळी विजयी झाल्या. नांदणी पंचायत समितीत काँग्रेसच्या नीलम म्हेत्रे, तर चिपरी पंचायत समितीत शिंदे शिवसेनेचे प्रवीण देसाई विजयी झाले.

एकूण निकाल पाहता शिरोळ तालुक्यात आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाला मतदारांनी स्पष्ट कौल दिला असून पंचायत समितीवर सत्ता प्रस्थापित करत जिल्हा परिषदेतही निर्णायक भूमिका बजावण्याची संधी शिंदे शिवसेनेला मिळाली आहे.

दत्तवाडमध्ये शिंदेंचा विजय; दिग्गजांना धक्का

माजी जि प सदस्या रंजना कोळी तर परविन पटेल यांचे पती दादेपाशा पटेल यांचा पराभव झाला, तर दत्तवाड मध्ये गत निवडणुकीत श्रीमंत विजीत सिंह शिंदे यांचा पराभव झाला होता तर त्यांच्या पत्नी श्रीमंत उत्तरादेवी शिंदे ह्या विजयी झाल्या,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT