rains raised the level of the Panchganga by 8 feet
कोल्हापूर : पंचगंगा नदीचे पाणी कोणत्याही क्षणी गायकवाड वाड्याकडून शिवाजी पुलाकडे जाणार्‍या रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजता पंचगंगेचे रस्त्याजवळ आलेले पाणी.  Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : संततधार पावसाने दिवसभरात पंचगंगेची पातळी 8 फुटांनी वाढली

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रांत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे एका दिवसात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 8 फुटांची वाढ झाली. शुक्रवारी सकाळी पंचगंगा तिसर्‍यांदा पात्राबाहेर पडली. रात्री 11 वाजता पाणी पातळी 34.6 फुटांवर होती. पंचगंगेची वाटचाल आता 39 फुटांच्या इशारा पातळीकडे सुरू आहे. गेल्या 24 तासांत राधानगरीसह जिल्ह्यातील 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली असून, पाटगाव येथे 300 मि.मी., तर घटप्रभा येथे 230 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील 74 बंधारे पाण्याखाली गेले असून, त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.

  • 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी; 74 बंधारे पाण्याखाली

  • पंचगंगा तिसर्‍यांदा पात्राबाहेर

  • पाटगाव येथे 300, तर घटप्रभा येथे 230 मि.मी. पाऊस

  • जिल्ह्यात 22 खासगी मालमत्तांचे 13 लाखांचे नुकसान

पावसाच्या जोरदार सरी

शहरात शुक्रवारी दिवसभर कोसळधारा सुरू होत्या. पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे दुचाकीस्वारांसह नागरिकांना ये-जा करताना कसरत करावी लागत होती. जिल्ह्यातही सर्वदूर पावसाचा जोर होता. गेल्या 24 तासांत शाहूवाडी तालुक्यातील आंबा (149.8), राधानगरी तालुक्यातील सरवडे (82.3), गगनबावडा (123.3) व साळवण (77.3) येथे अतिवृष्टी झाली आहे. हवामान विभागाने शुक्रवारी कोल्हापूरला ‘रेड अलर्ट’ दिला होता. यामुळे शहरासह जिल्ह्यात सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली होती. राधानगरी धरण 70.05 टक्के भरले असून, धरणातून 1,400 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 16 धरण क्षेत्रांपैकी 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये राधानगरी (163 मि.मी.), तुळशी (111), दूधगंगा (73), कासारी (105), कडवी (94), कुंभी (162), पाटगाव (300), चिकोत्रा (135), चित्री (95), जंगमहट्टी (101), घटप्रभा (230), जांबरे (165), सर्फनाला (155), कोदे (177) येथे पाऊस झाला आहे. याशिवाय भुदरगड तालुक्यातील कोंडोशी लघू प्रकल्प तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गेल्या 24 तासांत पंचगंगेच्या पाणी पातळीत 8 फुटांची वाढ झाली आहे. गुरुवारी रात्री 9 वाजता 26 फूट 3 इंचांवर असणारी पंचगंगा शुक्रवारी रात्री 11 वाजता 34.6 फुटांवर पोहोचली होती.

झाड कोसळल्याने चारचाकीसह दुचाकींचे नुकसान

दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे शहरात सात ते आठ ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. आरटीओ ऑफिस, शाहूपुरी पाच बंगला, शिवाजी पार्क, नागाळा पार्क, केएमटी वर्कशॉप येथे झाडे उन्मळली. यामध्ये चारचाकी व दुचाकींचे नुकसान झाले आहे. याशिवाय जिल्ह्यात 22 खासगी मालमत्तांचे 13 लाख 85 हजारांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 17 कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली. तसेच 4 जनावरांच्या गोठ्यांचीही पडझड झाली.

...तर पंचगंगा गाठणार इशारा पातळी

सकाळी सात वाजता राजाराम बंधार्‍याजवळ पंचगंगेची पाणी पातळी 29 फूट 8 इंच इतकी होती. दुपारी 12 वाजेपर्यंत पाणी पातळीत 2 फूट 8 इंचांची वाढ होऊन ती 32 फूट 6 इंचांवर पोहोचली होती. सायंकाळी पाच वाजता पाणी पातळी 33 फूट 6 इंचांवर होती. रात्री 10 वाजता पाणी पातळी 34 फूट 2 इंचांवर पोहोचली होती. पाणी पातळीत अशीच वाढ सुरू राहिल्यास शनिवारी पंचगंगा इशारी पातळी गाठू शकते.

‘हे’ मार्ग बंद

राज्य परिवहन महामंडळाच्या अहवालानुसार, पावसामुळे गडहिंग्लज-कोवाडे मार्ग ऐनापूरच्या पुढे बंधार्‍यावर पाणी आल्याने बंद झाला आहे. गारगोटी-आजरा मार्गावर साळगाव बंधार्‍यावर पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. चंदगड-हेरे मार्ग पुलावर पाणी आल्याने, तर राधानगरी तालुक्यातील वाळवा-बाचणी मार्गावर पुलावर पाणी आल्याने मार्ग बंद झाला आहे.

SCROLL FOR NEXT