Rahul Patil Rajesh Patil join NCP
कोल्हापूर : मी राजकारणात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. अनेकजण आले, अनेकजण गेले, पण कुठल्याही परिस्थितीत राहुल पाटलांना राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा निर्णय चुकीचा आहे, असं वाटणार नाही. हा माझा शब्द आहे. यापूर्वी महाराष्ट्रात बाभूळगाव आणि सडोलीचं नातं होत. आता काटेवाडी आणि सडोलीचं नातं महाराष्ट्र पाहणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.२५) येथे सांगितले.
कोल्हापुरातील सडोली येथे दिवंगत माजी आमदार पी.एन.पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी पवार बोलत होते. यावेळी वैदयकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणाची सुरुवातच मिश्कील अंदाजात “आई लव्ह यू” या विधानाने केली. यानंतर त्यांनी उपस्थितांना उद्देशून स्पष्ट केले की, “लाडक्या बहिणींनो गैरसमज करु नका... हे लाडक्या भावांना म्हणालो”. यामुळे सभेत हास्यचे कारंजे उडाले.
ते पुढे म्हणाले, तुम्ही योग्य पक्षाची निवड केली आहे, याचा मला आनंद आहे. राहुल पाटील आणि त्यांच्या समर्थकांच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक वाढणार आहे. राष्ट्रवादीत अनेक पक्ष प्रवेश झाले, पण राहुल पाटलांच्या प्रवेशामुळे मला सर्वात जास्त आनंद होत आहे. यशाने कधीही माणूस गर्विष्ठ होऊ नये आणि अपयशाने खचून जायचं नाही. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल, यासाठी ज्योतिषाची गरज नाही.
मी स्वतः शेतकरी आहे. शेतकरी ही आपली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही अडचण येणार नाही, यासाठी महायुती सरकार काम करत आहे. 2017 आणि 2019 ला कर्जमाफी झाली, पण आर्थिक शिस्तही तितकीच आवश्यक आहे. घेतलेलं कर्ज वेळेवर फेडणारा कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.
यावेळी कार्यकर्त्यांना मिश्कील टोला देत अजित पवार म्हणाले, “तू माझी लिंक तोडतोस, लिंक तुटली की माझा मूड जातोय, आणि मूड गेला की तुझं काही खरं नाही. विधानसभा निवडणुकीला जर टाळ्या आणि शिट्या वाजवण्याऐवजी मतदार आणून बटणं दाबली असती, तर वेगळं चित्र दिसलं असतं.
विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही. म्हणून घोटाळ्यांचे आरोप करून लोकांची दिशाभूल करत आहेत. मतचोरी झाल्याचं सांगून खोटं बोलत आहेत. पराभव झाल्यावर विरोधकांची अवस्था अशी असते की, खोटं बोला पण रेटून बोला. भावाच्या नात्याने आमच्या लाडक्या बहिणींना कधीही अंतर पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे.