राशिवडे : राधानगरी तालुक्यातील ऐनीपैकी हुडा येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळताच पोलिस आणि चाईल्ड लाईनने वेळीच हस्तक्षेप करत विवाह थांबवला. पोलिस निरीक्षक संतोष गोरे आणि चाईल्ड लाईन समन्वयक अनुजा पुरंदर यांच्या तत्परतेमुळे हा बालविवाह टळला आहे.
ऐनीपैकी हुडा येथे अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहीती पो.नि. गोरे यांना दुरध्वनीद्वारे मिळाली होती. त्यानंतर चाईल्ड लाईनच्या समन्वयक अनुजा पुरंदर, जुबेर शिकलगार, नवीन गुरव, जिल्हा महिला बाल विकासाचे सुहास वाईगडे, राज्य महिला आयोगाचे आनंदा शिंदे यांनी संबधित मुलीचे नातेवाईक आणि मुलाचे नातेवाईकांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावून घेतले. मुलीच्या वयाचा दाखला, आधार कार्डची तपासणी केली असता मुलीचे एक वर्षांने वय कमी असल्याचे आढळून आले. यानंतर हा अल्पवयीन विवाह करता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी तसे लेखी दिल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. कालच या मुलीचा हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला होता, लग्न होण्याआधीच हा अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात आला.