कोल्हापूर : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नाट्यकलेला वाव देणार्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या कोल्हापूर विभागीय प्राथमिक फेरीत देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सने ‘ग्वाही’ या एकांकिकेसाठी प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्रीय कलोपासक, गायन समाज देवल क्लब आणि शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने ही स्पर्धा गोविंदराव टेंबे रंगमंदिर येथे घेण्यात आली होती. रविवारी सायंकाळी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
यंदा स्पर्धेचे हे 15 वर्ष असून, 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरदरम्यान कोल्हापूर विभागीय फेरीत एकूण 21 एकांकिका सादर करण्यात आल्या. स्पर्धेत द्वितीय क्रमांक नागठाणेच्या आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या ‘सोयरीक’, तर तृतीय क्रमांक शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाच्या ‘अ युजलेस जीनियस’ या एकांकिकेला मिळाला. शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या ‘अस्तित्व’ या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचा मान मिळाला. या चारही एकांकिका अंतिम फेरीस पात्र ठरल्या आहेत.
स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून अनिरुद्ध दिंडोरकर, गोपाळ जोशी आणि ज्ञानेश मुळे यांनी काम पाहिले. या स्पर्धेची अंतिम फेरी डिसेंबर महिन्यात पुणे येथे पार पडणार आहे. विजेत्या संघांचा गौरव शिवाजी विद्यापीठाचे प्रो. व्ही. एन. शिंदे, देवल क्लबचे व्ही. बी. पाटील आणि संजय हळदीकर यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेचे संयोजन सचिन पुरोहित, आशुतोष देशपांडे आणि सुबोध गद्रे यांनी केले, तर सूत्रसंचालन मनीष आपटे यांनी केले.
वैयक्तिक पारितोषिके
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी दिग्दर्शक
अभिषेक हिरेमठ स्वामी (डी.आर.के. कॉलेज)
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक
श्रुती साळुंखे (राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय
पार्थ पाटणे (डी.आर.के. कॉलेज)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
अक्षता बारटक्के (डी.आर.के. कॉलेज)
अभिनय नैपुण्य अभिनेत्री
स्वरा जोग (चिंतामणराव व्यापार महाविद्यालय)
अभिनय नैपुण्य अभिनेता
हर्षवर्धन भोसले (नागठाणे कॉलेज)
उत्तेजनार्थ पारितोषिके
श्रावणी मारकड, आदित्य सुतार, सोनाली मुसळे, अभिषेक हिरेमठ स्वामी, सहयोगिता चौधरी.