शिरोली ; सांगली फाटा येथे भर पावसात महामार्ग प्रशासनाने खड्डे बुजवणे सुरू केले आहे Pudhari
कोल्हापूर

Pune Bengaluru Highway Pothole | पुणे–बेंगळुरू महामार्ग प्रशासनाचा अजब कारभार; भर पावसात खड्डे बुजवण्याचा फार्स

सांगली फाट्यावर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनचालकांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur Pulachi Shiroli Pothole Repair

नागाव : पुणे–बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली येथील महाडिक पेट्रोल पंपासमोरील गेल्या वर्षभरापासून जीवघेणे ठरलेले खड्डे अखेर सोमवारी बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, संपूर्ण उन्हाळा उलटल्यानंतर थेट मुसळधार पावसातच हे काम सुरू करण्यात आल्याने महामार्ग प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिक आणि वाहनचालकांनी या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महाडिक पेट्रोल पंपासमोरील सुमारे दीड किलोमीटर परिसरात गेल्या वर्षभरापासून कोल्हापूर व पुण्याकडे जाणारी वाहतूक डिव्हायडरचे पार्टिशन करून एकाच लेनवरून वळविण्यात आली आहे. अरुंद मार्ग, मोठे खड्डे आणि वाहतुकीचा वाढता ताण यामुळे या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनांचे संतुलन बिघडून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली.

भर पावसात डागडुजीवर प्रश्नचिन्ह

मुसळधार पाऊस सुरू असताना आणि रस्त्यावर पाणी साचलेल्या परिस्थितीत खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आल्याने या डागडुजीच्या टिकाऊपणाबाबत वाहनचालकांनी शंका व्यक्त केली आहे. हे काम उन्हाळ्यात किंवा कोरड्या हवामानात झाले असते, तर त्याचा अधिक चांगला परिणाम झाला असता, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. पावसात करण्यात आलेले डांबरीकरण किती दिवस टिकणार आणि त्यावर झालेला खर्च कितपत परिणामकारक ठरणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

सांगली फाट्यावर वाहतुकीचा खोळंबा

खड्डे बुजविण्याच्या कामामुळे बेंगळूर आणि कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक महाडिक बंगल्याजवळून सेवा रस्त्यावर वळविण्यात आली होती. मात्र, पुरेशा वाहतूक नियोजनाअभावी सांगली फाटा उड्डाणपूल चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पावसात नागरिक, महिला, लहान मुले, रुग्ण तसेच नोकरदारांना तासन्तास अडकून राहावे लागले.

महामार्गावरील खड्ड्यांची डागडुजी आवश्यक असली, तरी त्यासाठी योग्य वेळ आणि वाहतुकीचे प्रभावी नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची भावना वाहनचालकांनी व्यक्त केली. वारंवार होणाऱ्या तात्पुरत्या दुरुस्त्यांऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT