Exorcism Superstition Incident in kolhapur
कोल्हापूर : पुरोगामी कोल्हापूरमध्ये भूत उतरविण्याचा धक्कादायक आणि अघोरी प्रकार समोर आला आहे. झपाटलेल्या एका महिलेच्या अंगातून भूत उतरविण्याचा प्रकार मांत्रिकाने केला आहे. हा धक्कादायक प्रकार कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर रात्रीच्या वेळी घडला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होऊ लागला आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
पंचगंगा नदी घाटावर फिरायला आलेल्या काही नागरिकांनी याचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. दहा ते बारा जण मिळून एका महिलेचे भूत काढत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
या व्हिडिओत एका बाईच्या अंगात आलेले दिसून येत आहे. प्रतिकात्मक भूत ओरडतात. तशी ती ओरडताना दिसत आहे. तिची हालचाल अंगात आल्यासारखी दिसून येत आहे. तर मांत्रिक तिच्यावर लिंबू फिरवत होता. गुलाल, अंगारे टाकत आहे. मंत्रोपचार करत आहे. तर महिलेचे कुटुंबीय हताश झाल्यासारखे हा सर्व प्रकार बघत आहे. नदी काठावर गुलाल, भात, लिंबू, अगरबत्ती ठेवल्याचे दिसत आहे. महिलेला काही मानसिक आजार असेल, त्यातून तिला काही त्रास होत असेल, तर त्यावेळी ते आवाज काढत असेल. हा हातचलाखीचा प्रकार असावा, असे सांगतिले जात आहे.
कोल्हापुरात पंचगंगा नदी घाटावर एक अघोरी प्रकार घडत असल्याची घटना समोर आली. एका महिलेला भूत झपाटले असल्याचे म्हणत तंत्र मंत्राच्या सहाय्याने पूजा केली जात असलेला व्हिडिओ समोर आला. घाटावर सुरू असलेल्या या प्रकारामुळे भीतीचे वातावरण आहे. मात्र या असल्या प्रकाराची प्रशासनाने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी.- गीता हासुरकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती