कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी शासन सकारात्मक आहे. लवकरच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक होणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रविवारी सांगितले. जिल्ह्यातील अनेकांचे शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश होतील, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ होणे गरजेचे आहे, असे सांगत आबिटकर म्हणाले, हद्दवाढीबाबत न्यू पॅलेस येथे बैठक झाली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समवेत हद्दवाढीबाबत लवकरच मुंबईत बैठक होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांना आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. याच भूमिकेतून शिवसेना शिंदे गटाची वाटचाल सुरू आहे. पक्षवाढीची सर्वांनाच मुभा आहे असे सांगत ते म्हणाले, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेकजणांचे लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश होतील, असेही त्यांनी सांगितले.