Private bus overturns at Ambap Phata, fortunately no casualties
कासारवाडी : पुढारी वृत्तसेवा
पुणे-बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर अंबप फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बेंगलुरू होऊन मुंबईला चाललेली खासगी आराम बस उलटली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. चालक व प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना आज (सोमवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
या विषयी घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, रेश्मा टूर्स यांची आराम बस सोमवारी पहाटे बेंगलुरूहून मुंबईला जाण्यासाठी निघाली होती. यामध्ये सुमारे २५ प्रवासी होते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुणे-बेंगलुरु महामार्गावर हातकणंगले तालुक्यातील अंबप फाटा येथे बस आली.
अंबप फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने मुख्य रस्त्यावरून सेवा रस्त्याकडे वाहतूक वळवली आहे. वळवलेली वाहतूक चालकाच्या निदर्शनास आली नसल्याने त्याने सरळ बस घेतली. पुढे सिमेंटचे ब्रॅकेट्स लावल्याने त्यांना धडकून बस डाव्या बाजूला उलटली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. चालकासह यातील प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना दोन रुग्णवाहिकेतून एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.