पालकमंत्री प्रकाश आबिटकर (File Photo)
कोल्हापूर

Kolhapur ZP Election | अखेर ना. प्रकाश आबिटकर आणि के. पी. पाटील सरवडे मतदारसंघात एकत्र!

Kolhapur ZP Election | मेव्हण्या–पाहुण्यांचे शह-काटशहाचे राजकारण!

पुढारी वृत्तसेवा

  1. सरवडे जि. प. मतदारसंघात ना. प्रकाश आबिटकर आणि के. पी. पाटील यांची अनपेक्षित युती.

  2. ए. वाय. पाटील व मोरे गटाविरोधात आबिटकर–के. पी. पाटील–खराटे एकत्र.

  3. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील चिन्हबदलामुळे राजकीय समीकरणे बदलली.

  4. पंचायत समिती व जि. प. स्तरावर उमेदवारांची हायव्होल्टेज लढत.

  5. नेत्यांच्या बदलत्या भूमिकांमुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण.

गुडाळ : आशिष ल. पाटील

जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील या मेव्हण्या–पाहुण्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले असून, यातूनच के. पी. पाटील यांनी आपले परंपरागत विरोधक पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी सरवडे जि. प. मतदारसंघात युती केली आहे. दरम्यान, आजरा–भुदरगड आणि राधानगरीमधील चार जि. प. मतदारसंघांत परस्परविरोधात लढत असलेले ना. प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के. पी. पाटील सरवडे जि. प. मतदारसंघात मात्र एकत्र आल्याने येथील लढत हायव्होल्टेज होणार आहे.

या मतदारसंघात आ. सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केडीसीसीचे संचालक ए. वाय. पाटील यांच्या पुढाकाराने स्वर्गीय विजयसिंह मोरे गट आणि ए. वाय. पाटील गटात युती झाली आहे. येथे स्वर्गीय मोरे यांच्या स्नुषा सौ. संयोगिता रणधीर मोरे या जि. प. च्या उमेदवार आहेत. तर त्या अंतर्गत सोळांकुर पंचायत समिती गणात ए. वाय. पाटील यांचे बंधू आर. वाय. पाटील आणि सरवडे गणात ए. वाय. समर्थक सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील हे उमेदवार आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही उमेदवारांनी राष्ट्रीय काँग्रेसचा ‘हात’ हे चिन्ह घेतले आहे.

ए. वाय. पाटील यांना शह देण्यासाठी माजी आमदार के. पी. पाटील यांनी सरवडे जि. प. मतदारसंघात जनता दलाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव खोराटे यांच्या स्नुषा आणि ना. आबिटकर यांच्या शिवसेनेच्या उमेदवार सौ. पूजा कपिल खोराटे यांना पाठिंबा दिला आहे. त्या अंतर्गत सरवडे पंचायत समिती मतदारसंघात उबाठा शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेशराव चौगुले यांना के. पी. पाटील यांनी राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हावर उमेदवारी दिली आहे.

तर सोळांकुर पंचायत समिती मतदारसंघात ना. आबिटकर यांचे कट्टर समर्थक व मार्गदर्शक नंदकिशोर सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ए. वाय. पाटील आणि मोरे गटाविरोधात आता ना. प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील आणि विठ्ठलराव खराटे हे एकत्र आल्याने या मतदारसंघात हायव्होल्टेज लढत अपेक्षित आहे.

उमेदवारांच्या बदललेल्या चिन्हांमुळे जनता संभ्रमात!
या मतदारसंघात काही उमेदवारांच्या बदललेल्या चिन्हांनी जनतेला संभ्रमात टाकले आहे. आयुष्यभर जनता दलाचा समाजवादी विचार जोपासणाऱ्या विठ्ठलराव खराटे यांनी सुनेच्या हातात शिवसेनेचा धनुष्यबाण दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या ए. वाय. पाटील यांचे बंधू आर. वाय. पाटील यांनी काँग्रेसचा ‘हात’ हातात घेतला आहे. तर शिवसेनेच्या फुटीनंतर गेली काही वर्षे सरवडे परिसरात उबाठा शिवसेनेची मशाल तेवत ठेवणाऱ्या जिल्हा उपाध्यक्ष सुरेश चौगुले यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ‘घड्याळ’ हातात बांधले आहे. नेत्यांच्या बदलत्या राजकीय भूमिकांमुळे जनता मात्र संभ्रमात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT