PRADA leather Sandals Row
शेखर पाटील
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय अब्जावधी रुपयांचं मूल्य असलेल्या प्राडा या आंतरराष्ट्रीय ब्रँडने मनाची गरीबी दाखवत कोल्हापुरी चप्पलच श्रेय लाटले आहे. आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चपलेसारखी चप्पल घातलेल्या मॉडेलचे रॅम्पवॉक करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर ऐवढ्या मोठ्या कंपनीने कुठेही कोल्हापूरी चप्पल म्हणून याचा उल्लेख केला नाहीये किंवा याचे श्रेय दिलं नाहीये. त्यामुळे या चप्पल चोरांना धडा शिकवलाच पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया कोल्हापूरच्या चप्पल व्यावसायिकांमधून येत आहेत.
कोल्हापुरी चप्पल आणि 'PRADA Leather sandals' वाद नेमका काय आहे?
इटालियन लक्झरी ब्रँड PRADA ने नुकतंच मिलान फॅशन शोमध्ये मॉडेलना जी चप्पल दिली त्यावरून वाद झाला. फॅशन शोमध्ये मॉडेल कोल्हापुरी पद्धतीची चप्पल घालून रॅम्पवॉक करतायंत. या चपलांवर PRADA असे लिहून कंपनीने त्यांनीच या चपलेचा शोध लावल्याचा भासवलं. कमाल म्हणजे कोल्हापुरात जी चप्पल हजार, दोन हजारांना मिळते तीच चप्पल PRADA कंपनी लाख रुपयांना विकत आहे. एखाद्या गोष्टीतून प्रेरणा घेत स्वत: चा ब्रँड सुरू करणे यात काही वावगं नाही. पण प्राडा कंपनीने हे करताना कोणत्याही पद्धतीने कोल्हापुरी चप्पल म्हणून याचा उल्लेख केला नाहीये किंवा याचं श्रेय देखील कोल्हापूरी चपलेला दिलं नाही.
कोल्हापुरी चप्पल असा ब्रँड न वापरता त्यांनी प्राडा ब्रँडच्या नावाखाली उत्पादन बाजारात आणलं. त्यांनी कोल्हापुरी चपलेचं डिझाईन चोरलं आहे. दुसऱ्यांचा ब्रँड चोरून स्वत:ची प्रसिद्धी करू नये. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी याची दखल घेत संबंधित कंपनीवर कारवाई करावी.कोल्हापुरी चप्पल व्यावसायिक
कोल्हापूरी चपलेला 2019 मध्ये जीआय मानांकन मिळाले असून GI मानांकन हे एखाद्या परिसरातील विशिष्ट उत्पादन किंवा वस्तूला दिले जाते. यातून त्या वस्तू अथवा उत्पादनाचे महत्त्व कायम राहते आणि उचलेगिरी करणंही शक्य नसते. जीआय मानांकन हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महत्त्वाचे ठरते. मात्र, प्राडा कंपनीने बिनधास्त उचलेगिरी केल्याने संताप व्यक्त होत आहे.
प्राडाने कोल्हापुरी चपलेचं डुप्लिकेशन केले आहे. ती चप्पल कोल्हापूरवरून नेली आहे का, ती चामड्याची चप्पल आहे का हे तपासलं पाहिजे.कोल्हापुरी चप्पल व्यावसायिक
कोल्हापूरमधील चप्पल व्यावसायिकांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या कृतीचा निषेध करावा तेवढा कमी. कोल्हापुरी चप्पल ही शहराची ओळख आहे. हा कलेचा एक वारसाच आहे, अशा शब्दात चप्पल व्यावसायिकांनी भावना व्यक्त केल्या.
सोशल मीडियावरही अनेकांनी PRADA ला चप्पल चोर अशी उपमा देत त्यांच्याच पोस्ट वरती शेकडो कमेंट केल्या आहेत.सुरूवातीला काहींनी याचं कौतुक केलं, पण ही उचलेगिरी आहे, याकडे जाणकारांनी लक्ष वेधले असता या घटनेचं महत्त्व अधोरेखित झाले आहे. आता PRADA कंपनीकडून याबाबत काही स्पष्टीकरण येणार का हे मात्र आता पाहण्याची गरज आहे.