कोल्हापुरी चप्पलचा पाकिस्तानातही रुबाब

मागणीमध्ये पाकिस्तान जगात पाचव्या स्थानी; पारंपरिक बांधणीसह ट्रेंडी पायताणने ओलांडली सीमा
kolhapur News
कोल्हापुरी चप्पलचा पाकिस्तानातही रुबाब आहे.
Published on
Updated on
अनुराधा कदम

कोल्हापूर : कोल्हापुरी वैशिष्ट्यांपैकी एक असलेले कोल्हापुरी चप्पल भारताबरोबरच भारताबाहेरील लोकांनाही खुणावत आहे. चामड्यापासून हाताने बनवले जात असल्याने त्याला नैसर्गिक जोड आहे. वातावरणातील उष्णतेपासून शरीराला गारवा देण्यात कोल्हापुरी चप्पलचा बोलबाला आहे. आता कोल्हापुरी पायताणने पाकिस्तानातील नागरिकांनाही भुरळ घातली असून, पाकिस्तानातून कोल्हापुरी चप्पलला मागणी वाढली आहे. पारंपरिक बांधणीला नव्या डिझाईनची जोड देत कोल्हापुरी पायताणचा रुबाब पाकिस्तानात पोहोचला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 50 हजार कुटुंबीय अस्सल कोल्हापुरी चप्पल बनवतात. चामडे कमवून त्यापासून कोल्हापुरी चप्पल तयार करणार्‍या कारागिरांची 700 वर्षांपासून पिढीजात परंपरा आहे. दणकट, रुबाबदार आणि आरोग्यदायी असलेले कोल्हापुरी चप्पल आजमितीस जगभरात पोहोचले आहे. काळानुरूप बदल करत नव्या फॅशनमध्येही या चप्पलची डिझाईन बनवली जात असल्याने लहान मुलांपासून मोठ्यांसह महिलांसाठीही खास आकर्षक पद्धतीने कोल्हापुरी चप्पलची निर्मिती केली जात आहे. पाकिस्तानी नागरिकांना कोल्हापुरी चप्पलचे आरोग्यदायी महत्त्व पटले आहे. पाकिस्तानमधील अतिउष्ण भागातील नागरिकांना कोल्हापुरी चप्पलचा गारवा भावला आहे. तसेच या चप्पलची बांधणी करत असताना वापरल्या जाणार्‍या तेलामुळे मऊपणा त्वचेसाठी चांगला असल्याने या कारणानेही पाकिस्तानातून कोल्हापुरी चप्पलला मागणी वाढत आहे.

महिलांकडून खास नव्या डिझाईन्सला पसंती

कोल्हापुरी चप्पलची बांधणी पारंपरिक पद्धतीने केली जात असली, तरी सध्याच्या फॅशन युगात टिकण्यासाठी कारागिरांनी या चप्पलला नवीन ट्रेंडी लूक दिला आहे. महिलांना कोल्हापुरी चप्पलचे ट्रेंडी रूप खुणावत आहे. यामध्ये पाकिस्तानी महिलांचीही भर पडली आहे. विणकामासाठी रंगीत धागे वापरले जाणारे, तसेच विविध रंगांच्या पॉलिशमधील कोल्हापुरीची खरेदी पाकिस्तानी महिलांकडून केली जात आहे.

ऑनलाईन मार्केटमुळे...

विविध प्रकारच्या ऑनलाईन पोर्टल व साईटस्वरून कोल्हापुरी चप्पल जगभरातील लोकांना खरेदी करणे सोपे झाले आहे. हव्या त्या डिझाईन्सचे फोटो पाहून ऑर्डर दिल्यानंतर कोल्हापुरी चप्पल जगात कुठेही पाठवता येते. याचा फायदा पाकिस्तानी नागरिकांनीही घेतला आहे. काही महिन्यांत जगभरातून कोल्हापुरी चप्पलला येणार्‍या मागणीत पाकिस्तानचा क्रमांक पहिल्या पाच देशांमध्ये आहे. पाकिस्तानातील लाहोर हे कोल्हापुरी चप्पल पाठवण्याचे मुख्य केंद्र असून, तेथून या चप्पलचे ग्राहकांना वितरण केले जाते.

‘कोल्हापुरी’ची परंपरा 13 व्या शतकापासून

कोल्हापुरी चप्पलचा इतिहास तेराव्या शतकाशी जोडला गेला आहे. या चपलेला राजेशाही लोकांनी पहिल्यांदा वापरले होते. तेव्हापासून आजपर्यंत पिढ्यान्पिढ्या 700 वर्षे ही चप्पल तयार करण्याची परंपरा आजही जपली आहे. इतिहासकारांच्या मतानुसार, कोल्हापुरी चप्पल अठराव्या शतकात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news