विशाळगड : पावडाईवाडी येथील मुलांना शिक्षणासाठी ओढयाच्या पाण्यातून जीवघेणी कसरत करावी लागत आहे. 'नको आम्हाला पक्का रस्ता आमचा निसरडा रस्ता बरा, आम्हाला नको सिमेंटचा पूल पण साधा लाकडी किंवा लोखंडी साकव तरी बांधा,' अशी साद येथील चिमुकले विद्यार्थी प्रशासनाला घालत आहेत. एखादा लाकडी साकव अथवा लोखंडी साकव उभारून शैक्षणिक नुकसान व जीवघेणा प्रवास थांबवावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
खोंगेवाडी-पावडाईवाडी दरम्यान एक ओढा आहे. पावसाळ्यात हा ओढा दुथडी भरून वाहतो. पाऊस कमी झाल्यास ओढ्यातील पाणी कमी होते. मात्र पाण्याच्या प्रवाहाला मोठी गती असते. त्यामुळे या ओढ्यातून जाताना पाय घसरून अथवा पाण्याच्या प्रवाहाने वाहण्याची भीती असते. ६ ते १० वयोगटातील चिमुकल्यांना या ओढ्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. खोंगेवाडी येथे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून पावडाईवाडी-खोंगेवाडी दरम्यानच्या ओढ्यावरून गेल्यास फक्त एक किलोमीटरच शाळा आहे. अन्यथा तीन किलोमीटरचा वळसा घालून शाळेत जावे लागत असल्याने या ओढ्यातूनच मुले जीवघेणा प्रवास करत आहेत. ओढ्याच पाणी वाढलं की मुलांना शाळेला दांडी मारावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. शाळेत जाण्यासाठी पावसाळ्यात जीवघेणा प्रवास दररोज करावा लागत आहे. येथे लाकडी अथवा लोखंडी साकव उभारावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.