नेकनूर, पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसामुळे गावातील खराब रस्त्यामुळे शाळेला जाताना अडचण येत होती. ग्रामपंचायतीकडे मागणी होवून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे. शाळकरी मुलांनी ग्रामपंचायतमध्येच शनिवारी (दि.27) शाळा भरवली, ही घटना नेकनूर येथे घडली. बहादुर शहा जफर उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 500 विद्यार्थ्यांनी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीमध्येच शाळा भरवली. ग्रामपंचायतीमध्ये शनिवारी ठिय्या मांडला मुरूम टाकण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत सोडली.
पावसाळ्यामध्ये नेकनूर मधील बहुतांश रस्ते चिखलात बुडाले आहेत. यामुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे. यामुळे चिखलातून शाळेकडे जाताना बहादूर शाह जफर शाळेतील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शनिवारी (दि.27) शाळेतील जवळपास पाचशे विद्यार्थी शिक्षकासहित नेकनूर ग्रामपंचायत कार्यालयात धडकले. या ठिकाणीच विद्यार्थ्यांनी शाळा भरवत निवेदनाद्वारे या रस्त्यावर मुरूम टाकण्याची मागणी केली. वीस फुटाच्या या रस्त्यावर अनेकांचा कचरा पडत असल्याने मोठी घाण होत आहे याकडेही लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. सरपंचांनी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीतून काढता पाय घेतला. शिक्षक कॉलनी परिसरातही अनेक ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाली. असून या भागाकडे तर कोणालाच लक्ष द्यायला वेळ नसल्याने नागरिकांना कसरत करीत मार्ग शोधावा लागत आहे.