सुभाष पाटील
विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील पावनखिंड, गजापूर, आणि येळवणजुगाई पठारावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) व्हावी, यासाठी नागरिक आणि युवकांमधून तीव्र मागणी होत आहे. प्रामुख्याने डोंगराळ भूभाग आणि रोजगाराची कमतरता असलेल्या या तालुक्यासाठी ही एमआयडीसी 'संजीवनी' ठरू शकेल, असा ठाम विश्वास सामाजिक कार्यकर्ते आबा वेल्हाळ यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना व्यक्त केला.
डोंगराळ आणि दुर्गम तालुका म्हणून ओळख असलेल्या शाहूवाडीतून रोजगार नसल्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण कामाच्या शोधात मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. ही एमआयडीसी झाल्यास, याच तरुणांना आपल्या गावी परत येऊन सक्षम होण्याची आणि हक्काचा रोजगार मिळवण्याची मोठी संधी मिळेल.
एमआयडीसीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी-सुविधा या प्रस्तावित ठिकाणी सहज उपलब्ध आहेत, याकडे वेल्हाळ यांनी लक्ष वेधले. गजापूर, येळवणजुगाई आणि पावनखिंड परिसरात हजारो एकर मुलकीपड (शासकीय) जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाचे भू-संपादनाचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कासारी प्रकल्प अवघ्या दोन-तीन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे एमआयडीसीला पाण्याची भरपूर सोय उपलब्ध होईल. तसेच, कासारी प्रकल्पावरील विद्युत प्रकल्पामुळे उद्योगांसाठी वीजही सहज उपलब्ध होणार आहे.
एमआयडीसीमुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. हजारो युवकांना रोजगार मिळेल, ज्यामुळे शाहूवाडी तालुक्याचा संपूर्ण कायापालट होणार आहे. औद्योगिक प्रकल्पांमुळे दळणवळणाची साधने विकसित होऊन संपूर्ण तालुक्याला विकासाची चालना मिळेल.
गेल्या अनेक वर्षांपासून शाहूवाडीत एमआयडीसीसाठीची मागणी सातत्याने होत आहे. या मागणीला मूर्त रूप देण्यासाठी आमदार डॉ. विनयरावजी कोरे आणि खासदार धैर्यशील माने यांनी विशेष लक्ष घालून त्वरित प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी युवक आणि ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.
डोंगराळ भागातील तरुणांचे स्थलांतर थांबवून त्यांना तालुक्यातच सक्षम करण्याची क्षमता या एमआयडीसीमध्ये आहे. त्यामुळे शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शाहूवाडीतील जनता व्यक्त करत आहे.
"सर्व दृष्ट्या सोयीस्कर अशी जमीन अन्य ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे शासनाने भविष्याचा विचार करून या मागणीचा गांभीर्याने विचार करावा."आबा वेल्हाळ, सामाजिक कार्यकर्ते