River Pollution  
कोल्हापूर

Panchganga River Pollution | पंचगंगेला जलपर्णीचा विळखा,मच्छीमार कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान, शिरढोण-टाकवडे परिसरात उपासमारीची वेळ

Panchganga River Pollution | दूषित पाणी आणि जलपर्णीच्या वाढत्या विळख्यामुळे पंचगंगा नदी परिसरातील मच्छीमारांवर मोठे संकट ओढावले आहे.

पुढारी वृत्तसेवा

दूषित पाणी आणि जलपर्णीच्या वाढत्या विळख्यामुळे पंचगंगा नदी परिसरातील मच्छीमारांवर मोठे संकट ओढावले आहे. शिरढोण-टाकवडे भागातील नदीपात्र अक्षरशः जलपर्णीने झाकले गेले असून पारंपरिक मासेमारी करणे अत्यंत कठीण बनले आहे. परिणामी अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा आली असून उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नदीतील पाण्याची गुणवत्ता खालावत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे. औद्योगिक सांडपाणी आणि इतर घातक घटक नदीत मिसळत असल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे. दूषित पाण्यामुळे मासळीचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे.

त्यातच जलपर्णीच्या प्रचंड वाढीमुळे जाळे टाकणे, गळ टाकणे किंवा थेट नदीत उतरून मासेमारी करणे धोकादायक आणि खर्चिक ठरत आहे. अनेकदा जाळी जलपर्णीत अडकून फाटत असल्याने आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. रोजंदारीवर अवलंबून असलेल्या मच्छीमार कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

मासेमारी हा एकमेव व्यवसाय असल्याने उत्पन्नाचे साधनच ठप्प झाले आहे. काहींनी पर्यायी रोजगाराच्या शोधात इतरत्र वळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे; मात्र कौशल्य आणि साधनांच्या मर्यादांमुळे तेही सहज शक्य होत नाही. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

स्थानिक मच्छीमारांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन नदीपात्रातील जलपर्णी तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. तसेच नदीतील दूषित पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

बाधित मच्छीमारांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करून त्यांना दिलासा द्यावा, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे. मच्छीमार नेते अरविंद सासणे (बापू) यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न केवळ मच्छीमारांचा नाही, तर संपूर्ण परिसराच्या पर्यावरणाशी संबंधित असल्याने शासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT