कुरुंदवाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना धनाजी चुडमुंगे Pudhari
कोल्हापूर

Andolan Ankush Sanghatana | ...तर इचलकरंजीचा पाणीपुरवठा बंद करू: आंदोलन अंकुश संघटनेचा इशारा

१ तारखेपासून इचलकरंजी कृष्णा पाणी योजनेच्या केंद्राजवळ उपोषण सुरू करणार

पुढारी वृत्तसेवा

Panchganga River Pollution Issues

कुरुंदवाड : पंचगंगा नदीत रासायनिक सांडपाणी सोडून प्रदूषण होत असल्याचा आरोप करत आंदोलन अंकुश संघटनेने इचलकरंजी महापालिकेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास इचलकरंजीचा पाणीपुरवठा बंद पाडण्याचा इशारा संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी दिला.

कुरुंदवाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चुडमुंगे म्हणाले की, येत्या १ तारखेपासून इचलकरंजी कृष्णा पाणी योजनेच्या केंद्राजवळ उपोषण सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतरही प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.

इचलकरंजी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत रासायनिक पाण्याचा वापर शेतीसाठी करण्याचा निर्णय झाला होता. मात्र अलीकडील पाहणीत काळ्या ओढ्यातून थेट पंचगंगा नदीत रासायनिक पाणी सोडले जात असल्याचे आढळल्याचा दावा त्यांनी केला.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाचा पंचनामा केला असून, तो रोखण्यासाठी काही प्रक्रिया उद्योग मालक आणि कामगारांकडून दबाव टाकण्यात आल्याचाही आरोप चुडमुंगे यांनी केला. पाहणीदरम्यान मोठ्या प्रमाणात रासायनिक पाण्याची आवक होत असल्याचे तसेच अत्यल्प पाणी शेतीसाठी वापरले जात असून उर्वरित सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.

इचलकरंजीतील सुमारे १५० प्रक्रिया उद्योगांमधून दररोज मोठ्या प्रमाणात सांडपाणी निर्माण होते. हे पाणी ३०० एकर शेतीसाठी पुरेसे असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात एवढी शेती उपलब्ध नसल्याने उर्वरित पाणी पंचगंगा नदीत मिसळले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

नदी प्रदूषण तातडीने थांबवण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा कनवाड येथून इचलकरंजीला होणाऱ्या पाणीपुरवठ्यालाही विरोध करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला.

या पत्रकार परिषदेला बंडू बरगाले, आयुब पट्टेकरी, विश्वास बालीघाटे, सुनील सावंत, राकेश जगदाळे, प्रभाकर बंडगर, गोपाळ चव्हाण, रशीद मुल्ला, दीपक पाटील, एकनाथ माने आणि अंकुश पाटील उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT