कोल्हापूर

Kolhapur rain update: शिरोळच्या पंचगंगा नदीवरील बंधाऱ्याला भगदाड

संरक्षण भिंत वाहून गेल्याने अस्तित्व धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर : शिरोळ येथील पंचगंगा नदीवरील ऐतिहासिक कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दक्षिणेकडील संरक्षण भिंत पुराच्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे. या बंधाऱ्याला मोठे भगदाड पडल्याने संपूर्ण बंधाऱ्याच्या सुरक्षिततेवर आणि अस्तित्वावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पाटबंधारे विभागाच्या अनेक वर्षांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच ही दुरवस्था झाल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

तत्कालीन माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील आणि आमदार रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या दूरदृष्टीतून उभारण्यात आलेला हा बंधारा शिरोळ तालुक्यातील हजारो एकर शेतीसाठी आणि अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून मुख्य आधार राहिलेला आहे. तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यात या बंधाऱ्याचा मोठा वाटा आहे.

मात्र, गेल्या काही वर्षांत प्रशासनाने याच्या दुरुस्तीकडे पूर्णपणे पाठ फिरवली. सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी वारंवार मागण्या करूनही केवळ कागदी घोडे नाचवले गेले. तीन वर्षांपूर्वी आमदारांच्या प्रयत्नातून पश्चिम बाजूच्या मोहरीचे काम झाले, पण ते निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप झाला होता. तसेच पूर्वेकडील दगड ढासळत असतानाही खासदार, आमदार व संबंधित यंत्रणेने याकडे गांभीर्याने पाहिले नाही.

अखेर या निष्काळजीपणाचा फटका बसून दक्षिण बाजूचा मोठा कठडा वाहून गेला आहे. यामुळे बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक अत्यंत धोकादायक बनली असून, मुख्य संरचनेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने तांत्रिक पाहणी करून संरक्षण भिंतीचे पुनर्बांधकाम करावे आणि मजबुतीकरण करावे, अशी मागणी होत आहे. अन्यथा तालुक्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT