Kolhapur Monsoon Update
पंचगंगेची पूर पातळी 41.9 फुटांवर file photo
कोल्हापूर

कोल्हापूर : पंचगंगेची पूर पातळी 41.9 फुटांवर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या कोसळधारा सुरूच आहेत. मंगळवारी शहरात दिवसभर पावसाचे धूमशान सुरू होते. गेल्या 24 तासांत राधानगरीसह 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. राधानगरी धरण 90 टक्के भरले असून, धरणातून 1500 क्युसेक विसर्ग सुरू आहे. धुवाँधार पावसामुळे पंचगंगा धोका पातळीजवळ आली आहे. रात्री 12 वाजता पंचगंगेची पाणीपातळी 41 फूट 9 इंचांवर होती. पुराचे पाणी केर्ली रस्त्यावर आल्याने कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील केर्ली ते कोतोली फाटादरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली. शहारात पुराचे पाणी जामदार क्लबपर्यंत आले असून, आतापर्यंत शहरातील शंभारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. शहरात दिवसभर पावसाच्या कोसळधारा सुरू होत्या. दिवसभर कोसळणार्‍या सरींमुळे सखल भागात काही ठिकाणी अक्षरशः गुडाभर पाणी साठले होते. जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असून, गेल्या 24 तासांत राधानगरी (68.7 मि. मी.) तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. याशिवाय तालुक्यातील सरवडे (75), कसबा तरळे (91.8), राधानगरी (91.8) सह शाहूवाडी तालुक्यातील करंजफेन (73.5), मलकापूर (69.3), आंबा (98). येथे अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली गेले असून, दीडशेहून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे.

14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

गेल्या 24 तासांत 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये राधानगरी (137 मि. मी.), तुळशी (146), वारणा (110), दूधगंगा (109), कासारी (99), कडवी (100), कुंभी (106), पाटगाव (160), चिकोत्रा (115), चित्री (110), जंगमहट्टी (79), घटप्रभा (166), जांभरे (140), सर्फनाल (200), कोदे (172) अतिवृष्टी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला 25 जुलैपर्यंत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

8 राज्यमार्ग व 26 प्रमुख जिल्हा मार्ग बंद

पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने 8 राज्यमार्ग व 26 प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. केर्ली गावाजवळ मंगळवारी पाणी आल्याने कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग बंद झाला आहे. केर्ली, जोतिबा रोड, पन्हाळा रोड, दानेवाडी, वाघबीळ या मार्गाने पर्यायी वाहतूक सुरू आहे. दरम्यान, शिये - बावडा मार्गाच्या रस्त्यालगत पाणी आले आहे. पाणीपातळीत वाढ झाल्यास या मार्गावर पाणी येण्याची शक्यता आहे.

117 खासगी मालमत्तेचे 46 लाखांचे नुकसान

गेल्या 24 तांसात जिल्ह्यातील 33 पक्क्या घरांची, तर 97 कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली आहे. याशिवाय 8 जनावरांच्या गोठ्यांचीही पडझड झाली. जिल्ह्यात 117 खासगी मालमत्तेचे 46 लाख 46 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यातील आणखी 22 घरांची अंशतः पडझड झाल्याचे जिल्हा आपत्ती विभागाकडून सांगण्यात आले.

9 धरण क्षेत्रांत सलग सहा दिवस अतिवृष्टी

गेल्या सहा दिवसांपासून धरण क्षेत्रांत अतिवृष्टी सुरू आहे. पावसाचा जोर वाढतच असून, गेली सलग सहा दिवस 9 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी सुरू आहे. यामध्ये राधानगरी, वारणा, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, घटप्रभा, सर्फनाल, कोदे धरणांचा समावेश आहे.

आतापर्यंत 102 नागरिकांचे स्थलांतर

शहराला पुराचा विळखा बसण्यासची भीती निर्माण झाली आहे. यामुळे पूरप्रवण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. मंगळवारी पंचगंगेच्या पाणीपातळी 41 फूट 6 फुटांच्या पुढे गेली. यामुळे पुराचे पाणी येणार्‍या भागातील नागरिक स्थलांतराच्या तयारीत आहेत. पुराचे पाणी वाढत असल्याने शहरातील पूरप्रवण भागातील आतापर्यंत 102 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. यामध्ये 40 पुरुषांचा, 29 महिलांचा व 33 लहान मुलांचा समावेश आहे. यातील काही नागरिकांचे चित्रदूर्ग मठ येथे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच आंबेवाडी, चिखली येथील ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात येत आहे. याशिवाय ग्रास्थांकडून पाळीव प्राण्यांचे स्थलांतर सुरू आहे.

SCROLL FOR NEXT