कोल्हापूर : शिवनेरी गडावरील शिवाई देवीच्या मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका बुधवारी करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी ठेवण्यात आल्या. अंबाबाई मंदिर हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या वतीने या पादुकांवर मंत्रघोषात विधिवत अभिषेक करण्यात आला.
शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावर शिवाई देवीच्या मंदिरात छत्रपती शिवरायांच्या धातूच्या पादुका स्थापन करण्यात आल्या आहेत. गेल्या 28 वर्षांपासून दरवर्षी शिवभक्त पन्हाळा पावनखिंड या मोहिमेत या पादुकांसह सहभागी होतात. यंदा प्रथमच या पादुका वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर व अंबाबाई मंदिर येथे आणण्यात आल्या. मोहिमेचे समन्वयक डॉ. संदीप महिंद, कृष्णा भोसले, राजेश भोजे, उमेश दहीने, विनायक सुतार हे पादुका घेऊन मंदिरात आले. पादुकांवर अभिषेक केल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आल्या.
यावेळी श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनीश्वर, सहसचिव अजित ठाणेकर, केदार मुनिश्वर, अनिकेत अष्टेकर, योगेश जोशी, सचिन ठाणेकर, सचिन गोटखिंडीकर, शाम पुरोहित, संजय फलटणकर यांच्यासह देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह भाविक उपस्थित होते.