Operation cable : कृष्णा काठी 'ऑपरेशन केबल' फेल! सैनिक टाकळीत ४ चोरट्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले file photo
कोल्हापूर

Operation cable : कृष्णा काठी 'ऑपरेशन केबल' फेल! सैनिक टाकळीत ४ चोरट्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले

चोरट्यानी मध्यरात्री उसातून काढला पळ

पुढारी वृत्तसेवा

'Operation Cable' fails on the banks of the Krishna River! Farmers at Sainik Takli chased away four thieves

सैनिक टाकळी : पुढारी वृत्तसेवा सैनिक टाकळीच्या कृष्णा पट्ट्यात काल मध्यरात्री जे घडलं ते एखाद्या सिनेमाच्या क्लायमॅक्सला शोभेल असंच होतं! शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या केबल चोरांना गावच्या पोरांनी असा काही धडा शिकवला की, चोरट्यांना हातात आलेली केबल टाकून जीव वाचवण्यासाठी उसाच्या शेतात पळावे लागले.

नेमकं घडलं काय?

रात्री ११ ते ११:३० च्या दरम्यान कृष्णा नदीच्या अंधाऱ्या काठावर ४ सराईत चोरटे दबा धरून बसले होते. मिलिंद पाटील, रामचंद्र पाटील आणि आदिनाथ शिरहट्टी या तीन शेतकऱ्यांच्या मोटारीच्या केबल त्यांनी दगडाने ठेचत कापून काढल्या होत्या. माल गोळा करून पोते भरण्याची तयारी सुरू होती.

पण गाव जागं होतं...

वारंवार केबल चोरीने वैतागलेल्या सैनिक टाकळीच्या युवकांनी ८ दिवसांपासून गुप्त 'नाईट पेट्रोलिंग' सुरू केलं होतं. टॉर्चच्या प्रकाशात चोरट्यांची कुजबुज ऐकू येताच गस्तीवर असलेल्या २ युवकांनी गावच्या ग्रुपवर एकच मेसेज टाकला - "कृष्णा काठावर या, चोरटे सापडले!"

पुढच्या १० मिनिटात काय झालं? १०० ते १५० तरुण, हातात काठ्या, दोरखंड आणि टॉर्च घेऊन नदीकडे धावत सुटले. जमावाचा आवाज ऐकून चोरट्यांची बोबडीच वळाली.

रात्री 2 वाजेपर्यंत सर्च ऑपरेशन

जमाव जवळ येताच चोरट्यांनी कापलेल्या केबली जागेवरच फेकल्या आणि अंधाराचा फायदा घेत ४ वेगवेगळ्या दिशेने उसातून सैरावैरा पळ काढला. युवकांनी रात्री २ वाजेपर्यंत संपूर्ण पट्टा, उसाची शेते आणि बांध पिंजून काढले, पण अंधाराने चोरट्यांना वाचवले.

दैव बलवत्तर म्हणून ३ शेतकऱ्यांचे १ लाख रुपयांपर्यंतचे नुकसान टळले आहे. आता या टोळक्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचावा अशी मागणी होत आहे.

"आम्ही रक्ताचं पाणी करून शेती करायची आणि या चोरांनी एका रात्रीत ३० हजारांची केबल कापून न्यायची? आता नाही सोडणार. काल ते निसटले, पण रोज रात्री १०० पोरं गस्त घालणार. सापडले तर जाग्यावरच हिसका दाखवू."
आदिनाथ शिरहट्टी एक संतप्त शेतकरी सैनिक टाकळी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT