नृसिंहवाडी बसस्थानक विकसित करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही file photo
कोल्हापूर

नृसिंहवाडी बसस्थानक विकसित करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही

नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी आले असता त्यांनी बसस्थानकाची पाहणी केली.

पुढारी वृत्तसेवा

Nrusinghwadi bus stand will be developed; Transport Minister Pratap Sarnaik Gives Assurance

नृसिंहवाडी : पुढारी वृत्तसेवा

नृसिंहवाडी येथील बसस्थानक यात्रेकरूंच्या दृष्टीने महत्वाचे आहे. आगामी काळात गर्दीच्या नियोजनाप्रमाणे बसस्थानक विकसित करावे लागणार आहे. बसस्थानकाच्या पश्चिम बाजूस तरुणांना रोजगारासाठी व्यापारी गाळे करणे, अत्याधुनिक सुविधा देणे अशा कामांच्या प्रस्तावाला प्राधान्य देणार असल्याचे राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी आले असता त्यांनी बसस्थानकाची पाहणी केली.

येथील दत्त मंदिरात दर्शन घेऊन राज्याच्या समृद्धीसाठी त्यांनी प्रार्थना केली. दत्त देवस्थानचे अध्यक्ष गुंडो पुजारी, सचिव नारायण गेंडेपुजारी व विश्वस्तांनी त्यांचा प्रसादभेट देऊन सत्कार केला. ग्रामपंचायत विश्रामगृहात आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासमवेत त्यांनी नृसिंहवाडी विकासासंबंधी चर्चा केली.

यावेळी माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी आगामी कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकाच्या जागेचा बहुपर्यायी वापर करण्याबाबत मागणी केली. या जागेत व्यापारी गाळ्यांसह वरील मजल्यावर वाहनतळ उभारण्यासंबंधी त्यांनी आराखडा प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून शासनाकडे दिला असल्याचे सांगितले.

यावर मंत्री सरनाईक यांनी सकारात्मक भूमिका घेऊन विविध टप्प्यात कामे पूर्णत्वास नेऊ, असे आश्वासन दिले. यावेळी आ. अशोकराव माने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने, माजी उपसरपंच अभिजित जगदाळे, कुरुंदवाडचे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, कुरुंदवाड आगार व्यवस्थापक आसामा सय्यद, ग्रामसेवक हेमंतकुमार कोळी आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT