कोल्हापूर

पाठीचा कणा कसा सांभाळाल? डॉ. भोजराज यांचे व्याख्यान :दै. ‘पुढारी’ व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा संयुक्‍त उपक्रम

अनुराधा कोरवी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

दै. 'पुढारी' व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 'मान व पाठदुखी : प्रतिबंधात्मक उपाय' या विषयावर शनिवारी
(दि. १८) जगद्विख्यात स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. केशवराव भोसले नाट्यगृह येथे सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

बदलती जीवनशैली, धावपळीचे जीवन, ताणतणाव, असंतुलित आहार, वाहनांचा, मोबाईलचा तसेच ऑनलाईन प्रणालीचा अतिरिक्त वापर, यामुळे मान, पाठदुखीच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. ही मान व पाठदुखीची समस्या अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे. सर्वांना भेडसावणार्‍या या समस्येमुळे 'पाठीचा कणा कसा सांभाळावा' या विषयावरील व्याख्यानास अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

'डॉक्टर्स डे' निमित्त दरवर्षी दै. 'पुढारी' व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या वतीने गेली 18 वर्षे अविरतपणे व्याख्यानमाला सुरू आहे. वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजांनी या व्याख्यनमालेतून दिलेला आरोग्य मंत्र लाखो लोकांसाठी आरोग्य संजीवनी ठरत आहे. आतापर्यंत डॉ. प्रमोद जोग (पुणे), योगी डॉ. संप्रसाद विनोद, डॉ. के. एच. संचेती, आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर, मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. कल्याण गंगवाल, डॉ. प्रेमानंद रामाणी, डॉ. सलीम लाड, डॉ. सतीश गुप्ता, डॉ. मनू कोठारी, डॉ. मिलिंद मोडक, डॉ. गजानन रत्नपारखी, डॉ. आसगावकर, डॉ. भोरास्कर, डॉ. लीली जोशी, डॉ. जगदिश हिरेमठ, डॉ. मदन फडणीस, डॉ. अनंतभूषण रानडे आदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञांची व्याख्याने झाली. तसेच आरोग्य शिबिरे व ध्यानमय योगासने शिबिर सुरू आहेत.

मुलांचे वेडेवाकडे मणके सरळ करणे, मानेची, कंबरेची गादी सरकणे, मज्जारज्जू दबणे, मणक्यातील विविध प्रकाराच्या गाठी, दोन्ही पायांना अपंगत्व आलेल्यांचे पुनर्वसन, विशेषकरून शेतकर्‍यांच्या मणक्यांच्या समस्या सोडवण्यात त्यांचा हातखंडा आहे. ते व्ही. एन. देसाई हॉस्पिटल, मुंबई येथे गरीब रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करत आहेत.

या व्याख्यानात बसणे, उठणे, मोबाईल वापरण्याची योग्य पद्धत, शारीरिक हालचाली, आहारविहार, तसेच मणक्यास इजा होऊ नये, यासह पाठदुखी, मानदुखी प्रतिबंध व उपाययोजना यावर आपल्या ओघवत्या शैलीतून मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थित श्रोत्यांच्या शंकांचे ते निरसन करणार आहेत. प्रवेश अग्रक्रमानुसार व कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून देण्यात येणार आहे. या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. संदीप ज. पाटील यांनी केले आहे.

डॉ. शेखर भोजराज यांचा परिचय

डॉ. शेखर भोजराज एम.एस. ऑर्थो., एफ.सी. पी.एस.डी. ऑर्थो. आहेत. ते असोसिएशन ऑफ स्पाईन सर्जन्स ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष होते. स्पाईन फाऊंडेशन, मुंबईचे अध्यक्ष आहेत. डॉ. भोजराज सध्या व्ही. एन. देसाई म्युनिसिपल हॉस्पिटल, मुंबई, लीलावती हॉस्पिटल मुंबई, ब्रीच कँडी हॉस्पिटल मुंबई, वोकार्ड हॉस्पिटल, मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांचे अनेक शोधप्रबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते भारतातील पहिले पूर्णवेळ कौशल्यपूर्ण स्पाईन सर्जन आहेत.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT