Sarthakraj Patil File Photo
कोल्हापूर

Kolhapur News: शेतकऱ्याच्या लेकाचा NDA मध्ये डंका, सार्थकराजने नेतृत्व केलेल्या परेडने देश भारावला

सैनिक टाकळी येथील सार्थकराज सागर पाटील यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), खडकवासला येथील भव्य पासिंग आऊट परेडमध्ये ड्रिल परेडचे नेतृत्व करून संपूर्ण गावाची मान अभिमानाने उंचावली आहे.

पुढारी वृत्तसेवा

सैनिक टाकळी: सैनिकांची परंपरा लाभलेल्या सैनिक टाकळी गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. येथील शेतकरी सागर धोंडीराम पाटील यांचे सुपुत्र सार्थकराज सागर पाटील यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), खडकवासला येथील भव्य पासिंग आऊट परेडमध्ये ड्रिल परेडचे नेतृत्व करून संपूर्ण गावाची मान अभिमानाने उंचावली आहे.

शेकडो कॅडेट्समध्ये परेडचे नेतृत्व करण्याचा बहुमान मिळणे ही अत्यंत कठीण आणि अभिमानास्पद कामगिरी आहे. वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि मान्यवरांसमोर शिस्तबद्ध पद्धतीने संचलनाचे नेतृत्व करत सार्थकराज यांनी आपला आत्मविश्वास, शिस्त आणि नेतृत्वगुण दाखवून दिला.

या परेडमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सार्थकराज यांना सिल्व्हर मेडलने सन्मानित करण्यात आले. NDA मधील तीन वर्षांच्या कठोर प्रशिक्षणात त्यांनी मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. दुसऱ्या वर्षापासूनच ड्रिलमधील नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत त्यांनी सातत्याने स्वतःला सिद्ध केले.

या यशामागे आई-वडिलांचे मोलाचे योगदान आहे. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलाला NDA पर्यंत पोहोचवणे, त्याच्यात देशसेवेचे स्वप्न रुजवणे आणि त्यासाठी सर्वतोपरी पाठबळ देणे, हे कौतुकास्पद आहे. वडिलांच्या घामाचे मोल आणि आईच्या संस्कारांचे बळ सार्थकच्या यशात दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT