Kolhapur Sugarcane | उसाची विनाकपात पहिली उचल; कोल्हापूर, सांगली देशात अव्वल!

पहिल्या हप्त्यात प्रतिटन ३,९०० ते ४,००० रुपयांचा दर; प. महाराष्ट्राचा दबदबा
Kolhapur Sugarcane |
Kolhapur Sugarcane | उसाची विनाकपात पहिली उचल; कोल्हापूर, सांगली देशात अव्वल!
Published on: 
Updated on: 

भीमगोंडा देसाई

कोल्हापूर : यंदाच्या ऊस गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनाकपात पहिली उचल जाहीर करण्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांनी देशात आघाडी घेतली आहे. देशातील प्रमुख ऊस उत्पादक राज्यांच्या तुलनेत या दोन्ही जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी सर्वाधिक पहिला हप्ता जाहीर केला आहे. त्‍यानुसार कारखाने पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करीत आहेत. ऊस उत्पादकांना प्रतिटन ३,९०० ते ४,००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे ऊस दराच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्राने देशाचे लक्ष पुन्हा वेधले आहे.

केंद्र सरकारने २०२६-२७ या गाळप हंगामासाठी १०.२५ टक्के मूलभूत साखर उताऱ्यावर प्रतिटन ३,६५० रुपये (प्रतिक्विंटल ३६५ रुपये) रास्त व किफायतशीर दर निश्चित केला आहे. मात्र, ‘स्वाभिमानी’सह विविध शेतकरी संघटनांच्या दबावामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांनी या आधारभूत दरापेक्षा अधिक दर देण्याची भूमिका घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पहिली उचल प्रतिटन ३,९०० रुपये निश्चित केली गेली आहे. ‘कोल्हापूर पॅटर्न’नुसार हंगाम संपल्यानंतर आणखी १०० रुपये आणि अटींच्या अधीन राहून २०० रुपये देण्याचे सूत्र आहे. त्यामुळे एकूण अंतिम दर ४,२०० रुपयांपर्यंत जाणार आहे.

सांगली जिल्ह्यात दराची स्पर्धा आणखी रंगली आहे. यातून एका कारखान्याने ४,००० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. तीन कारखान्यांनी ३,९०० रुपयांचा दर जाहीर केला आहे. याउलट सातारा जिल्ह्यात ३,८०० ते ३,९०० रुपये, पुणे जिल्ह्यात ३,४०० ते ३,६०० रुपये, सोलापूरमध्ये ३,२५० रुपये, तर अहिल्यानगरमध्ये ३,१०० ते ३,२०० रुपये पहिली उचल दिली जात आहे. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात बहुतांश कारखान्यांनी ३,५०० ते ३,६०० रुपये दर निश्चित केला आहे. सीमाभागातील काही कारखान्यांनी ३,८०० रुपयांपर्यंत दर जाहीर केला आहे.

उत्तर प्रदेश आणि गुजरातचा वेगळा पॅटर्न

गुजरातमध्ये जिल्हानिहाय पहिली उचल निश्चित नसून, एफआरपीच्या आधारे दर दिले जात आहेत. उत्तर प्रदेशातही राज्यव्यापी ऊस दर (एसएपी) लागू करण्याची पद्धत आहे. गुजरात व उत्तर प्रदेशात उचल केंद्र सरकारच्या नियमानुसार आधारभूत किंमत, तर हंगाम संपल्यानंतर उर्वरित रक्कम देणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.