नृसिंहवाडी : दर्शन वडेर
मिठाई उत्पादनातील भेसळीसंदर्भात दै. 'पुढारी'ने शनिवारी सडेतोड वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आता खव्याच्या निर्मितीमागे 'कर्नाटक कनेक्शन' असल्याचे बोलले जात असून कर्नाटकातील शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या दूध पावडरची महाराष्ट्रात आवक करून काळाबाजार केला जात आहे.
नृसिंहवाडी येथेही कर्नाटकातील शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या दूध पावडरची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. कर्नाटक सहकारी दूध उत्पादक फेडरेशनचा नंदिनी हा दूध संघ आहे. या दूध संघाकडून कर्नाटकातील शासकीय शाळांमधील विद्याथ्यर्थ्यांना क्षीर भाग्य योजनेअंतर्गत दूध पावडर देण्यात येते; मात्र ही पावडर मुलांपर्यंत न पोहोचवता शाळेतील शिक्षकच त्याचे भक्षक बनले आहेत.
एजंटांमार्फत महाराष्ट्रातील खवा उत्पादकांना ही दूध पावडर विकली जाते. इतर दूध पावडरच्या तुलनेत ही पावडर कमी किमतीत मिळत असल्याने नफ्याचे गणित साधून खवा उत्पादकही या कुटिल साखळीचा हिस्सा बनतात. एक किलो खवा तयार करण्यासाठी कमीतकमी चार लिटर दूध आटवावे लागते. यानुसार विक्री करायची झाल्यास ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. म्हणूनच कमी किमतीत कर्नाटकातील मुलांच्या वाट्याची दूध पावडर लुबाडून मालामाल होण्याचे पाप खवा उत्पादकांकडून होत आहे.
काही महिन्यांपूर्वी बागलकोट जिल्ह्यातील सुलीकेरी येथून सुमारे ४४.७ क्विटल दूध पावडर महाराष्ट्रात विकण्यासाठी आणली जात होती. संबंधित ट्रक व दूध पावडर कर्नाटक पोलिसांनी जप्त केला होता. या दूध पावडरीच्या तस्करीची साखळीच कर्नाटकात कार्यरत आहे. या साखळीला महाराष्ट्रातील नफेखोरांची जोड मिळाल्याने ही टोळी अधिक सशक्त बनली आहे.
नृसिंहवाडी येथील मिठाई विक्रेत्यांसाठी अकिवाट, गणेशवाडी, टाकवडे, मजरेवाडी या भागातून खवा येतो. हा भाग कर्नाटक सीमेवर असल्याने दूध पावडरची बेकायदेशीररीत्या वाहतूक होते. या दूध पावडरच्या पोत्यांवर स्पष्टपणे हे विक्रीसाठी नसल्याचे लिहिलेले असते; मात्र यात शिरोळ, कुरुंदवाडच्या पोलिसांना मलई मिळत असल्याने तेसुद्धा ही वाहने थांबवत नाहीत; मात्र 'गांधारी'च्या भूमिकेत असणारे कर्नाटक व महाराष्ट्रातील प्रशासन यावर कठोर कारवाई करणार का, हा प्रश्न आहे.
पावडरचा साठा
कर्नाटक राज्यातील शाळांमधील दूध पावडर विक्री करणाऱ्या एका एजंटास फोन करून चौकशी केली असता, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही पावडर पाठवून देतो. फक्त आज किती पाहिजे, ते सांगा म्हणजे उद्या पोहोच होईल, असे तो म्हणाला, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात एजंटांकडे या योजनेच्या पावडरचा साठा आहे, हे लक्षात येईल.
दूध पावडर म्हणजे भेसळ नव्हे;
पण... दूध पावडर पासून खवा तयार करणे, ही भेसळ नाही, तर ते नियमानुसार मान्य आहे; मात्र कर्नाटकातील विद्यार्थ्यांच्या वाट्याची दूध पावडर हिसकावून नफ्याचे गणित लावणे, हे चुकीचे आहे. या कुटील कारस्थानात कर्नाटकातील शाळा तर सहभागी आहेतच शिवाय मुंबई-पुण्यापासून ते बीडच्या येरमाळ्यापर्यंत ही पावडर जात असल्याने याची व्याप्ती मोठी आहे. याबाबत आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता असून खवा उत्पादकांमध्ये खळबळ उडाली आहे.