Electric Shock Monkey Death Kolhapur  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News | विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी वानराची मृत्यूशी झुंज अपयशी; वनविभागाचे प्रयत्न निष्फळ

Electric Shock Monkey | नागाव येथील आंबेडकर नगर परिसरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

Electric Shock Monkey Death Kolhapur

नागाव : विजेचा तीव्र धक्का बसून गंभीर जखमी झालेल्या एका वानराचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. नागाव येथील आंबेडकर नगर परिसरात ही घटना घडली असून, वनविभागाने केलेल्या प्रयत्नांनंतरही वानराचा जीव वाचू शकला नाही.

गेल्या काही महिन्यांपासून आंबेडकर नगर परिसरात वावरणारे हे वानर विजेच्या तारेच्या संपर्कात आले. उच्चदाब विद्युत प्रवाह शरीरातून गेल्याने ते गंभीररीत्या भाजले गेले आणि झाडावरून खाली कोसळले. या अवस्थेत काही कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केल्याने त्याच्या जखमा अधिक गंभीर झाल्या. जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या वानरामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत वानराला प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने रविवारी त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. वनविभागाच्या पथकाने तातडीने वानराला कोल्हापूर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले.

वनविभागाचे कर्मचारी व पशुवैद्यकीय डॉक्टरांनी वानराला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र विजेच्या तीव्र धक्क्यामुळे त्याचे अंतर्गत अवयव निकामी झाले होते तसेच शरीराचा मोठा भाग भाजला गेला होता. काही तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने अखेर या वानराचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे नागाव येथील आंबेडकर नगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, विजेच्या उघड्या तारांमुळे वन्यप्राण्यांच्या जीवितास निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत नागरिकांतून चिंता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT