कोल्हापूर

ढपला पाडता न आल्याने माजी पालकमंत्र्यांची तडफड; खा. धनंजय महाडिक यांचा आ. सतेज पाटील यांना टोला

मोहन कारंडे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरातील प्रस्तावित इनडोअर स्टेडियमसाठीचा मंजूर निधी खा. महाडिक यांच्यामुळे गेला, अशी धादांत खोटी विधाने माजी पालकमंत्र्यांकडून होत आहेत. साप साप म्हणून भुई थोपटण्यात ते वाक्बगार आहेत. इनडोअर स्टेडियमच्या कामातून ढपला पाडता आला नाही, हे त्यांचे खरे दुःख आणि तडफड आहे, असा टोला खा. धनंजय महाडिक यांनी आ. सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आपणच खेळाडूंचे तारणहार आहोत, असा दिखावा निर्माण करणार्‍या माजी पालकमंत्र्यांची भुलवणारी कार्यपद्धती सर्वांनाच माहीत आहे. राजकीय विद्वेषातून त्यांनी अनेकांना धोका दिला आहे. जवळपास 13 वर्षे उलटली, तरी कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचा थेट पाईपलाईनचा प्रश्न अजूनही मार्गी लागला नाही. दरवेळी हवेतील आश्वासने द्यायची, तारखा द्यायच्या आणि परस्पर मागल्या दाराने ढपला पाडायचा, ही ज्यांची नीती आहे, त्यांनी विकासाच्या बाता मारू नयेत. आयआरबीच्या माध्यमातून कोल्हापूरवर टोल लादण्याचा कोणी प्रयत्न केला, हे सर्वांनाच माहीत आहे. कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलन पेटलेले असताना स्वत: टोलची पावती फाडून माजी पालकमंत्र्यांनी ढपला पाडल्याची जाहीर कबुलीच दिली. त्यांना कोल्हापूरची जनता कधीच माफ करणार नाही, असेही पत्रकात म्हटले आहे.

स्वतः पंधरा वर्षे सत्तेमध्ये आणि आठ वर्षे मंत्री असताना त्यांना इनडोअर स्टेडियम पूर्ण करावे, असे कधी वाटले नाही. ज्या इनडोअर स्टेडियमबद्दल ते आता बोलत आहेत, त्याचा निधी दीड वर्षापूर्वी राज्य शासनाने मंजूर केला; मात्र दीड वर्षात कोणतेही काम झाले नसल्यानेच हा निधी राज्य शासनाने खेळाडूंच्या अन्य विकासकामांसाठी वळवला. इनडोअर स्टेडियम निधी स्थगितीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निधीतून कोल्हापूर शहरातील अनेक मैदानांचा विकास होईल. रुईकर कॉलनी, मेरी वेदर येथील मैदान, लाईन बाजार हॉकी मैदान, सासने मैदानमधील बॅडमिंटन कोर्ट आणि फुटबॉल मैदान, मंगेशकरनगरमधील फुटबॉल टर्फ अशा कामांसाठीच या निधीचा उपयोग होणार आहे. त्यामुळे विकासाच्या पोकळ गप्पा मारणार्‍यांनी आणि खेळाडूंबद्दल पुतना मावशीचे प्रेम दाखवणार्‍यांनी किमान यापुढे तरी चुकीचे आणि खोटे बोलणे थांबवावे, असा टोला खा. महाडिक यांनी पत्रकातून लगावला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT