कुरुंदवाड: पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तहसीलदार कार्यालय, कुरुंदवाड नगरपरिषद आणि तलाठी कार्यालयातर्फे मतदान कोणत्या उमेदवाराला केले, याची माहिती देणाऱ्या व्हीव्हीपॅट मशिनबाबत जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी प्रात्यक्षिक मतदान करून माहिती घेतली. माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी प्रात्यक्षिक मतदान करून सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मशीनची माहिती घ्यावी, असे आवाहन नागरिकांना केले.
निवडणूक विभागामार्फत विधानसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी. या दृष्टिकोनातून मतदान प्रक्रियेतील नव्याने निर्माण केलेल्या व्ही.व्ही. पॅट मशीनची कुरुंदवाड पालिकेत नागरिकांना प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष डांगे म्हणाले की, मतदान प्रक्रियेबाबत नागरिकांत ईव्हीएम मशीनबाबत शंका, कुशंका व संभ्रम निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाने नागरिकांनी केलेल्या मतदानाची खात्री देणाऱ्या व्ही.व्ही. पॅट मशीन ची निर्मिती करून मतदान प्रक्रिया पारदर्शक केली आहे. तरी नागरिकांनी या मशीनची माहिती घ्यावी.
मशीन बाबत माहिती देताना तलाठी एन.एस. जाधव म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी, नागरिकांच्या मनातील ईव्हीएम मशीनबाबत असणारे गैरसमज दूर व्हावेत, यासाठी व्ही.व्ही. पॅट मशीनची निर्मिती केली आहे. मतदाराने ईव्हीएम मशीनद्वारे मतदान केल्यानंतर अवघ्या ७ सेकंदात ते मत कुणाला दिले, उमेदवाराचे चिन्ह, नाव असलेली चिठ्ठी मशिनमधून मतदारांना मिळते. त्यामुळे मतदारालाही आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान केल्याची खात्री होणार आहे.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष लियाकत बागवान, दयानंद मालवेकर, शाहीर आवळे, कुदरत भुसारी, गौतम पाटील, सोमेश गवळी, टिक्काखान पठाण, राजेंद्र फल्ले, शकील गरगरे आदी उपस्थित होते.