

गडहिंग्लज : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी 50 लाखांची रोकड व चार किलो गांजा जप्त करून चौघा संशयितांना बेड्या ठोकल्या. या दोन्ही घटनांमध्ये एका निर्दोष व्यक्तीला अडकविण्याचा कट गडहिंग्लज पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले यांनी हाणून पाडत निष्पापाला वाचवले.
गुरव नावाच्या व्यक्तीचा फोन वापरून आजरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोघांनी गडहिंग्लज उपअधीक्षकांना गडहिंग्लज येथील कोड्ड कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये मोठ्या रकमेची उलाढाल होणार असल्याची माहिती दिली. इंगवले यांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता संशयास्पद परिस्थितीत 50 लाखांची रोकड आढळली. संबंधितांना रकमेबाबत पुरावे सादर करता न आल्याने पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेत आयकर खात्याला खबर दिली.
दुसर्या प्रकारात उत्तूर-जखेवाडी मार्गावर गुरव नामक व्यक्ती अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची खबर विश्वनाथ रायकर याने पोलिस उपअधीक्षकांना दिली. दोन्ही घटनांमध्ये गुरव नामक व्यक्ती हाच धागा असल्याने इंगवले यांनी मुळाशी जाऊन गुरव नावाच्या व्यक्तीबाबत घडलेले वेगळेच षड्यंत्र उघडकीस आणले. विश्वनाथ आनंदा रायकर, अभिषेक गजानन जाधव, अविनाश गजानन जाधव (सर्व रा. शिप्पूर) व प्रवीण सुभाष भाटले (रा. करंबळी) यांचे पांडुरंग हरी गुरव (53, सध्या रा. चर्च रोड, गडहिंग्लज, मूळ गाव बटकणंगले) यांच्याशी पैशाचे व्यवहार झाले होते. गुरव हे पैसे परत देत नसल्याचा राग मनात धरून त्यांना अमली पदार्थांच्या तस्करीत अडकवण्याचा कट वरील चौघांनी रचल्याचे समोर आले.