विशाळगड : पुढारी वृत्तसेवा: वेळ सकाळी ११ ची… मुलांच्या हातात लाकडी पाट, परात तांब्या, पेढे, फुले, हार तसेच रांगोळी काढण्यासाठी चिमुकल्यांची घाई-गडबड, पाटाशेजारी मांडलेल्या खुर्च्या आणि नटून-थटून शाळेत जाण्यासाठी पालकांची लगबग. चाळणवाडी (ता. शाहूवाडी) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मातृपूजन संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलं ही संस्कारक्षम असतात. त्यांच्यावर केलेले संस्कार चिरकाल टिकतात, ही बाब डोळ्यासमोर ठेवून नुकतेच रुजू झालेले शिक्षक संदीप पाटील यांनी आगळ्या-वेगळ्या संस्कार उपक्रमाचे आयोजन केले. यावेळी शाळेच्या आवारामध्ये झालेल्या या सोहळ्यामध्ये अनेक मातांनी सहभाग घेतला.
चिमुकल्यांनी आपल्या आईची पावले आपल्या चिमुकल्या हातात घेऊन, पाण्याने स्वच्छ धुवून, रुमालाने पुसून हळदीकुंकू पुष्प वाहत दर्शन घेतले. मातांनीही मनोभावे आपल्या लाडक्यांना आशीर्वाद दिले. या भावनिक दृश्याने काही मातांच्या डोळ्यात अश्रू तरळले. यावेळी काही मातांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना शाळेने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे खूप कौतुक केले. पुनश्च एकदा आपल्या थोर प्राचीन भारतीय संस्कृतीची या निमित्ताने ओळख करून देण्याचा शाळेने छोटासा प्रयत्न केल्याचे शिक्षक संदीप पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या रसिका जोगळे, पोलीस पाटील शंकर डाकरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक ढोके, उपाध्यक्षा विद्या ढोके, यांच्यासह पालक उपस्थित होते. केंद्र समन्वयक् राजेंद्र लाड यांची प्रेरणा या उपक्रमास लाभली. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रमुख शिक्षक संदीप पाटील यांनी केले. आभार समिधा बेंडके यांनी मानले.
आई म्हणून तू चल ना आजी शाळेत….
एका विद्यार्थिनीची आई आजारी असल्याने ती शाळेत येऊ शकत नव्हती. म्हणून तिने आजीला आजी तू शाळेत चल ना, असा आग्रह धरला. आजीने उत्तर दिले बाळा आईला बोलावले ना, त्यावर तिने आजी आई येत नाही, तूच आई म्हणून चल, आणि ती आजीला घेऊन शाळेत आली. नातीची पूजा पाहून आजी भारावून गेली.
संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी
विद्यार्थ्यांचा बौध्दिक विकासाबरोबरच भावनिक विकास व्हावा, लहान मुलांवर योग्य काळात संस्कार केले तर संस्कारक्षम पिढी निर्माण होईल त्यामुळे आई-वडिलांना वृद्धाश्रमाची वाट धरावी लागणार नाही. या उपक्रमास केंद्र समनव्यक राजू लाड यांनी प्रेरणा दिली.
– संदीप पाटील, शिक्षक
हेही वाचा