कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा नगरपालिकांसह 3 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 2) मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वरिष्ठ अधिकार्यांसह दीड हजारावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
निवडणूक काळात 125 गुन्हेगारांना तडीपार, 35 दारू तस्करांवर प्रतिबंध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मतदारांना आमिषे दाखवून हुल्लडबाजी करणार्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, गडहिंग्लज विभागाचे अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी रविवारी सकाळी जिल्ह्यातील निवडणूक क्षेत्रातील प्रभारी अधिकार्यांशी संपर्क साधून सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
निवडणुकीतील चुरस लक्षात घेऊन सराईत गुन्हेगारांसह काळात हुल्लडबाजी करणार्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वडगाव (28), जयसिंगपूर (10), शिरोळ (10), गडहिंग्लज (5), आजरा (5), चंदगड (8), कुरुंदवाड (10), हुपरी (10) अशा 125 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
मतदानासाठी अपर पोलिस अधीक्षक-2, पोलिस उपअधीक्षक -7, पोलिस निरीक्षक- 10, सहायक, उपनिरीक्षक-46, पोलिस 576, गृहरक्षक दलाचे जवान-485, राज्य राखीव दलाची 10 पथके, शिवाय 36 गस्ती पथके, जलद कृती दलाचे जवान असा फौजफाटा सज्ज ठेवल्याचे अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सांगितले.