

दिलीप भिसे
कोल्हापूर : नगरपालिकांसह नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 2) मतदान होत आहे. समर्थकांसह कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी उमेदवारांनीही निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुठ्या सैल सोडल्या आहेत. रंगेल मेजवान्यांचा फंडाच आहे. हॉटेल, धाब्यांसह माळरानावर पहाटेपर्यंत रेलचेल दिसून येत आहे. तळीरामांसाठी मनसोक्त बनावट, भेसळ दारू, नशिल्या गोळ्यांसह गांजाचे रतीबच सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर तस्करी टोळ्यांचा मिळकतीचा बेफाम धंदा सुरू झाला आहे. गोव्यासह कर्नाटकातून स्थानिक टोळ्यांना रसद पुरविली जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिकांसह 3 नगरपंचायतींसाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधींसह स्थानिक पातळीवरील आघाड्यांचा जोरदार सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. आरोप- प्रत्यारोपांचा प्रचंड धुरळा सुरू असतानाच दुसरीकडे मतदार, समर्थकांसह कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करण्यात येत आहे. निवडणूक अंतिम टप्प्यावर आल्याने उमेदवारांनीही खर्चासाठी हात सैल सोडला आहे. कपाटातून नोटांची बंडले बाहेर पडू लागली आहेत.
जिल्ह्यातील गडहिंग्लज, कागल, मुरगूड, जयसिंगपूर, वडगाव, कुरुंदवाड, शिरोळ, पन्हाळा, मलकापूर, हुपरीसह आजरा, चंदगड व हातकणंगले नगरपंचायतींसाठी मंगळवारी (दि. 2) मतदान होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग शुक्रवारी मोकळा झाल्यानंतर खर्चासाठी आखडते हात घेणार्या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी आर्थिक गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे.
नगरपालिका व नगरपंचायत हद्दीसह महामार्गावरील हॉटेल्स, धाब्यांवर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत तोबा गर्दी उसळली होती. बहुतांशी धाब्यांवर मध्यरात्रीपर्यंत वर्दळ दिसून येत होती. गोव्यातील बनावट आणि भेसळ दारूचा दोन-तीन दिवसांपासून महापूर दिसून येत आहे. गावठी ढोसणार्यांच्या हातातदेखील महागड्या दारूचा खंबा दिसून येत आहे. काही तळीराम झिंगलेल्या अवस्थेत घरदार, कामधंदा सोडून प्रचारात गुरफटलेले दिसून येत आहेत. विशेषत:, 22 ते 30 वयोगटातील तरुणाई निवडणूक काळात भरकटत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते. जानेवारी ते ऑक्टोबर 2025 या काळात जिल्ह्यात दीड कोटी किमतीचा 370 किलो गांजा आणि 15 लाख किमतीचा एमडी ड्रग्जसाठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. याशिवाय अफू आणि चरस विक्रीप्रकरणी एकूण पाचशेवर तस्करांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक काळात पोलिस रेकॉर्डवरील तस्कर जोमाने मिळकतीच्या धंद्यात उतरले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरवड्यापासून नशिल्या गोळ्यांसह गांजा तस्करीचा भाव वधारला आहे. चोरी चोरी... छुपके छुपके सुरू असलेली गांजा तस्करी खुलेआम सुरू झाली आहे. रोज सायंकाळला गांजा सहजरीत्या उपलब्ध होऊ लागला आहे. स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी जोमात आहे. कर्नाटकसह गोव्यातील तस्करी टोळ्यांतील साथीदारांचा जिल्ह्यात तळच पडला आहे. अमली तस्करीच्या माध्यमातून जिल्ह्यात रोज सायंकाळी लाखो रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे. फोफावणार्या तस्करीकडे स्थानिक पोलिस यंत्रणांचा कानाडोळा होत असल्याने तस्करीचे प्रस्थ वाढतच चालले आहे.