कोल्हापूर

निफाड : लष्करी जवानाने केला सत्यशोधक पद्धतीने विवाह

backup backup

निफाड, पुढारी वृत्तसेवा : निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील रहिवासी योगेश्वर धाकराव या भारतीय सेना दलातील जवानाने भारतीय लष्कराच्या आदर्शांचे पालन करीत जाती-धर्म भेद दूर ठेवून आणि कालबाह्य रूढी-परंपरांना बाजूला सारून सत्यशोधक पद्धतीने विवाह करीत समाजासमोर एक मोठा आदर्श घालून दिला आहे.

निफाड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. धारणगाव खडक येथील रहिवासी रामभाऊ धाकराव यांची ज्ञानेश्वर आणि योगेश्वर ही दोन्ही मुले भारतीय सेना दलात देशसेवेचे कर्तव्य बजावीत आहेत. भारतीय लष्करामध्ये जातीभेदाला आणि धर्म भेदाला स्थान नसल्याने आपला विवाहदेखील कोणत्याही धार्मिक रीतिरिवाज शिवाय आणि कालबाह्य रूढी परंपरांना वगळून करण्याचा निश्चय योगेश्वर यांनी केला.

कोल्हापूर येथील वकील श्रेया पवार यांची योगेश्वर यांच्याबरोबर मते व मने दोन्ही जुळल्याने त्यांनी देखील महात्मा फुले यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार सत्यशोधकी पद्धतीने विवाह करण्यास होकार दिला. निफाड येथील भाग्यश्री लॉन्समध्ये नुकताच हा विवाह संपन्न झाला. या विवाह सोहळ्यामध्ये धार्मिक रीतिरिवाजांना संपूर्णपणे फाटा देण्यात आलेला होता.

अक्षदाऐवजी वधू-वरांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. लग्नविधीसाठी धर्मगुरू बोलवण्याऐवजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सातारा, सांगली व निफाड येथील कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आलेले होते. वधूवरांमध्ये धरण्यात आलेला अंतरपाट हा भारतीय राज्यघटनेचा सरनामा होता तर वधू-वरांनी देवादिकांना वंदन करण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

वधू-वरांच्या स्वागतासाठी देखील कर्णकर्कश डीजे बँडऐवजी पारंपरिक संबळ पिपाणी या वाद्यांचा वापर करण्यात आलेला होता. या सोहळ्यामध्ये वधूची ओटी भरण्याचा कार्यक्रम हा वधूच्या हातात गुलाब पुष्प , संविधानाची प्रत आणि वैचारिक पुस्तके देऊन करण्यात आला. विवाह सोहळ्यासाठी जमलेल्या पाहुणे मंडळींना देखील गुलाब पुष्प आणि भारतीय संविधानाच्या सरनाम्याची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT