कोल्हापूर

Maratha Reservation news: मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा तीव्र होणार: शस्त्र म्हणून कोल्हापूर 'गॅझेट' आणि 'पेन'चे पूजन

Kolhapur Gazette latest news: खंडेनवमीच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापूरातील भवानी मंडप येथील तुळजाभवानी मंदिरात शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर: मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा तीव्र करण्याची तयारी सकल मराठा समाजाने केली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे असलेल्या 'कोल्हापूर गॅझेट'ची अंमलबजावणी आणि प्रशासकीय पातळीवरील कायदेशीर लढाईसाठी बुधवारी १ ऑक्टोबर रोजी खंडेनवमीच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापुरात विशेष शस्त्र पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पूजनानंतर मराठा आरक्षणाच्या अंतिम लढाईचे रणशिंग फुंकले गेले आहे.

खासदार शाहू महाराजांच्या हस्ते पूजन

कोल्हापूरातील भवानी मंडप येथील तुळजाभवानी मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे 'शस्त्र' म्हणून कोल्हापूर गॅझेट, पेन (लेखणी) आणि भारतीय संविधानाचे पूजन करण्यात आले. मराठा समाजाला कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवर आरक्षण मिळवून देण्यासाठी हे पूजन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. यावेळी इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांची देखील विशेष उपस्थिती होती.

कोल्हापूर गॅझेटचे काय आहे महत्त्व?

मराठा नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८८१ साली ब्रिटिश काळात तयार करण्यात आलेल्या कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी या दोन्ही जाती एकच असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारावर ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी हा ऐतिहासिक दस्तावेज अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक पुरावा ठरू शकतो.

आंदोलनाची पुढील दिशा काय असणार?

या 'गॅझेट'च्या आधारावर कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले मिळावेत, यासाठी आता प्रशासकीय पातळीवर जोरदार संघर्ष सुरू करण्यात येणार आहे. खंडेनवमीला शस्त्र पूजन करून जसे सैन्य लढायला बाहेर पडते, त्याचप्रमाणे मराठा आरक्षणासाठीची कायदेशीर आणि प्रशासकीय लढाई आता अधिक ताकदीने लढली जाईल, असे यावेळी खासदार शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केले आहे.

मराठा आंदोलनाला मिळणार नवी दिशा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील लढा सुरू असतानाच, कोल्हापूर गॅझेटच्या माध्यमातून प्रशासकीय स्तरावर आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न हा मराठा समाजाच्या आंदोलनाला नवी दिशा देणारा ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT