

कोल्हापूर : ‘मराठा-कुणबी’ हे एकच आहेत, हे स्पष्ट करण्यासाठी 1881 साली प्रकाशित केलेले कोल्हापूर जिल्ह्याचे गॅझेटियर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या गॅझेटियरमध्ये मराठा-कुणबी यामध्ये भेद नसल्याचा निर्वाळा देताना, त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली आहेच, त्यासह मराठा-कुणबी याबरोबर अन्य जातींच्या सूक्ष्म नोंदी करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याचे 1881 सालचे गॅझेटियर ब्रिटिशांनी प्रसिद्ध केले आहे. तत्कालीन जनगणनेच्या आधारावर या गॅझेटियरमध्ये तत्कालीन करवीर इलाक्यातील नोंदी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मराठा-कुणबी यांच्यात फार भेद नसल्याबाबतच्या नोंदी आहेत. दोघांचे राहणीमान सारखेच आहे. या दोन्ही समाजातील सण, उत्सव, आचरण पद्धती, जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व रूढी-परंपरा यांच्यात प्रचंड साम्य आहे. बहुतांशी बाबी या एकसारख्याच आहेत, त्यात फारसा भेद नाही. या दोन्ही समाजाच्या उपजीविकांची साधने, प्रकार, त्यांच्या दैनंदिन आहार, राहणीमान आदीही जवळपाससारखेच आहे. या दोन्ही समाजाच्या घरांचे स्वरूप, रंग-रूप, शरीरयष्टी, आडनावे आदींचीही तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही समाजात रोटी-बेटीचेही व्यवहार होत असल्याचे या गॅझेटियरमध्ये स्पष्ट केले आहे.
या गॅझेटियरमध्ये तत्कालीन इलाक्याची व्याप्ती असलेल्या कोल्हापूर, कागल, चंदगड, आजरा, राधानगरी, भुदरगड, हातकणंगलेचा काही भाग, सध्याच्या कर्नाटकातील रायबाग, कटकोळ, अकोळ आदी भागांतील नागरिकांच्या जातींच्या सूक्ष्म नोंदी नमूद करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मराठा, कुणबी, क्षत्रिय, खत्री, मुस्लिम, माळी, बेलदार, बुरुड, गवंडी, महार, मातंग, हणबर, कासार, लोहार, कुंभार, ओतारी, पाथरवट, रंगारी, शिंपी, सोनार, तांबट, तेली, गुरव, माळी, घडशी, दरवेशी, परीट, धनगर, बेरड, भंडारी यासह अनेक जाती-जमातींचा उल्लेख करण्यात आला आहे.