Kolhapur Crime News:
कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा धारदार शस्त्राने वार करून क्रूरपणे खून करण्यात आला. शनिवारी (१७ ऑक्टोबर) रात्री नऊच्या सुमारास सांस्कृतिक भवनासमोरील मंदिर परिसरात ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे माणगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
संबंधित मुलगी नववीच्या वर्गात शिकत होती. शनिवारी रात्री मंदिर परिसरात असताना संशयिताने तिच्या गळ्यावर व दंडावर धारदार शस्त्राने जीवघेणे वार केले. गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने इचलकरंजी येथील इंदिरा गांधी मेमोरियल (आयजीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन हातकणंगले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी फॉरेन्सिक पथकासह श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. संशयिताचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत तीव्र शोधमोहीम राबवण्यात आली.
कबनूर : धुळेश्वरनगर परिसरात शनिवारी भटक्या कुत्र्याने पावणे दोन वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. शंभूराजे पिसे असे त्याचे नाव असून त्याच्यावर इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. शंभूराजेच्या डाव्या हाताला व पायाला कुत्र्याने चावा घेतला. तसेच कपाळावर आणि नाकाखालीही जखमा झाल्या आहेत.
मागणी करूनही कार्यवाही रखडली? सुमारे महिनाभरापूर्वी कबनूर ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांचे लसीकरण व निर्बीजीकरण करण्यासाठी इचलकरंजी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाला कळविले होते. यासाठी ग्रामपंचायतीने निधीची तरतूदही केल्याचे सांगण्यात आले होते; मात्र अद्याप या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.