सरवडे, पुढारी वृत्तसेवा : पनोरी (ता. राधानगरी) येथील बोगद्याशेजारी तांबर नावाच्या शेताशेजारील दुधगंगा डाव्या कालव्याचा किलोमीटर सहामध्ये कालवा पात्राचा तळभागातून भले मोठे घळाचे भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाया जाऊन हजारो हेक्टर बागायत शेतपिकाचे नुकसान झाले आहे. वारंवार घडणाऱ्या कालवा फुटीच्या घटनेमुळे कालव्याच्या मजबुतीविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सध्या काळम्मावाडी धरणातून दुधगंगा डाव्या व उजव्या कालव्यात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. बुधवारी मध्यरात्री पाण्याच्या जोरदार प्रवाहाने पनोरी येथील बोगद्याजवळ घळ पडला. बघताबघता या घळाने आपला आकार जवळपास दहा फुट व्यासाचा झाला. त्यामुळे रात्रभर त्यातून पाण्याचा विसर्ग होऊन कालव्याखालील हजारो हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाले. संपूर्ण शिवार जलमय होऊन शिवाराला महापुराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. तसेच दुधगंगा नदीला मातीमिश्रित गढूळ पाणी आले आहे.
काळम्मावाडी धरणापासून डाव्या व उजव्या या दोन्ही कालव्याचा दहा ते बारा किलोमीटरचा अंतरावर वेगवेगळ्या ठिकाणी कालवा फुटीच्या घटना यापूर्वी वारंवार घडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी वारंवार घडणाऱ्या कालवा फुटीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून पाटबंधारे खात्याने त्याची वेळीच दखल घेऊन डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.