

कोल्हापूर ः शहरातील नेहमी गजबजलेल्या शाहूनगर येथे मंगळवारी (दि. 3) दुपारी भरदिवसा पाच वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा थरार घडला. चक्क व्यसनी पतीनेच पत्नीच्या शोधासाठी मेहुणीच्या हातातून हिसकावून तिच्या मुलीचे अपहरण करून कुटुंबीय वेठीस धरले. अखेर दिवसभराच्या नाट्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी बारा तासांत अपहरणकर्त्या संशयित आरोपींना बेड्या ठोकून मुलीची सुखरूप सुटका केली. संतोष सुरेश माळी (वय 33) व प्रथमेश सतीश शिंगे (25, दोघे रा. नवीन वसाहत, यादवनगर, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे असून, ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
माळीला दारूचे व्यसन असल्याने महिन्यापूर्वी त्याची पत्नी त्याच्या त्रासाला कंटाळून कुठे तरी निघून गेली होती. मेहुणी नकुशा कुमार चव्हाण हिने व सासरच्या लोकांनीच पत्नीला लपवून ठेवले किंवा तिला कुठे तरी पळून जाण्यास मदत केल्याचा संशय माळी याला होता. त्या रागातून माळी व शिंगे यांनी 3 डिसेंबरला दुपारी 3.30 वाजता शाहूनगर, राजारामपुरी येथून नकुशा चव्हाण यांच्या ताब्यातून त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीला हिसकावून घेतले. मुलीचे अपहरण करून मोटारसायकलवरून पळवून गेले.
माळी हा शाहूनगरमधून निपाणीच्या दिशेने महामार्गावरून मोटारसायकलवरून गेला. वाटेतूनच त्याने मुलीच्या आईला फोन केला. माझ्या पत्नीला समोर आणा नाही तर तुमच्या मुलीचे तुकडेतुकडे करून मारून टाकणार, अशी धमकी दिली. त्यामुळे मुलीच्या आईसह संपूर्ण कुटुंबीय भयभीत झाले. त्यांनी राजारामपुरी पोलिसांशी संपर्क साधला. राजारामपुरी ठाण्याचे पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तपासासाठी पथके तयार करून ठिकठिकाणी पाठविली. फोन कॉलसह इतर तांत्रिक पुराव्यांनुसार पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध सुरू केला. परंतु, त्यांनी फोन बंद केला होता. त्यामुळे ते कुठे गेले, याची माहिती मिळत नव्हती.
मंगळवारी दुपारपासून रात्रीपर्यंत मोटारसायकलवरून फिरल्याने अपहृत मुलगी थकली होती. माळी याच्या तावडीतून पोलिसांनी सुटका केल्यानंतर ती पोलिसांच्या कुशीत विसावली. दुपारपासून उपाशी असल्याने पोलिसांनी तिला खाऊ देऊन पोलिस व्हॅनमध्ये झोपविले. बुधवारी सकाळी पोलिसांनी चिमुरडीला तिच्या आईच्या ताब्यात दिले. यावेळी चिमुरडी आईला बिलगली अन् आईच्या आनंदाश्रूंचा बांध फुटला.