Hubballi Farmers Agitation Sugarcane MSP Demand
हुबळी (जि. धारवाड) : इथेनॉलचे खरेदी दर वाढवलेले नाहीत. हे दर १३ रुपयांनी वाढवून ७० रुपये प्रति लिटर करा यासह विविध मागण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटकातील हजारो शेतकऱ्यांनी हुबळीत धडक दिली आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी तातडीने मागणी पूर्ण करावी. अन्यथा आम्ही जागेवरून उठणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलनाचा एल्गार पुकारून ठिय्या मारला आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (दि.२९) कर्नाटकातील हुबळी येथे एका ऐतिहासिक आंदोलनाची सुरुवात झाली आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या मूळ गावी असलेल्या हुबळी येथील 'राणी चेन्नम्मा सर्कल' येथे हे आंदोलन ठिय्या स्वरूपात छेडले आहे.
कर्नाटक राज्य रयत संघ अध्यक्ष चुनाप्पा पुजारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह 'हसरू सेना पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही राज्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र येऊन या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
१. इथेनॉल खरेदी दरात वाढ: गेल्या तीन महिन्यांत ज्या पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिसळले जाते, त्या पेट्रोलचे दर प्रति लिटर १३ रुपयांनी वाढले आहेत. मात्र, केंद्र सरकारने इथेनॉलचे खरेदी दर वाढवलेले नाहीत. हे दर १३ रुपयांनी वाढवून ७० रुपये प्रति लिटर करण्यात यावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना प्रति टन सुमारे १२० रुपये अतिरिक्त भाव मिळू शकेल.
२. साखरेची एमएसपी (MSP) ५० रुपये करा: गेल्या आठ वर्षांपासून साखरेची किमान विक्री किंमत (MSP) ३१०० रुपये प्रति क्विंटलवरच स्थिर आहे. ही एमएसपी ५० रुपये प्रति किलो (५००० रुपये प्रति क्विंटल) करावी. यामुळे साखर कारखान्यांना बँकांकडून जास्त कर्ज उपलब्ध होईल आणि ते शेतकऱ्यांना ऊसाची पहिली उचल (पहिला हप्ता) घसघशीत देऊ शकतील.
केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात धारवाड पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. आंदोलकांनी हुबळी येथील चन्नमा सर्कलमध्ये ठिय्या मारून आंदोलनाला सुरुवात केली आहे. या ठिकाणीही पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शिवाय पार्किंगची आठ ते दहा ठिकाणी सुविधा करण्यात आली आहे